महाराष्ट्र अनेक बाबतीत देशात अव्वल पण अद्याप आव्हाने संपलेली नाहीत – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Date:

नवी दिल्ली, दि.१ :- भारताच्या उत्पन्नात महाराष्ट्राचे सर्वात जास्त म्हणजे पंधरा टक्के योगदान आहे. इथले सहकार प्रारूप देशाने स्वीकारले आहे. मराठी जनतेला इतिहासात संस्कृत, कला याचा प्रदीर्घ आणि समृद्ध वारसा लाभला आहे. परंतु, महाराष्ट्रासमोर आज अनेक आव्हाने उभी आहेत यावर मात केल्यास पुढील वाटचाल सुकर होईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे 39 वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘महाराष्ट्राची 60 वर्षातील जडणघडण  आणि आव्हाने’ या विषयावर बोलताना ते म्हणाले की, सामाजिक प्रबोधनाची सुरुवात महाराष्ट्रात बाराव्या शतकात झाली होती. ब्रिटिश राजवटीतसुद्धा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक सुधारणांना गती देणाऱ्या अनेक चळवळी सुरू झाल्या. सामाजिक प्रबोधनाची सुरवात संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या लेखणी आणि कीर्तनातून केली. पुढे राजधर्म पाळणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या जाणत्या राजाची त्याला जोड मिळाली. शाहू -फुले -आंबेडकर यांनी विषमतेविरुद्ध बंड पुकारून जागृती निर्माण केली.

महाराष्ट्र देशात अग्रेसर

श्री. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राचे सहकार प्रारूप देशातील अनेक राज्यांनी स्वीकारले. बँका, शिक्षण संस्था, शेतीमालावर प्रक्रिया करणारे सहकारी कारखाने, दूध डेअरीसारखे उद्योग, सूतगिरणी, कृषिमाल खरेदी-विक्री करणाऱ्या संस्था असा विविध क्षेत्रात राज्य अग्रेसर ठरले आहे. 1972 च्या दुष्काळात शेतकऱ्यांच्या हाताला काम देण्यासाठी महाराष्ट्राने रोजगार हमी योजना सुरू केली. पुढे मनरेगाच्या स्वरूपात देशात कायदा झाला.

महाराष्ट्राची पुरोगामी धोरणे

महिलांना केंद्रस्थानी मानून अनेक योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य आहे. नोकरीत 30 टक्के आरक्षण तर स्थानिक निवडणुकांमध्ये 50 टक्के आरक्षण महाराष्ट्राने दिलेले आहे. वर्ष २०१३ मध्ये जादूटोणा व अघोरी प्रथा विरोधी कायदा तर 2016 मध्ये सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा करून महाराष्ट्राने आपली पुरोगामी विचारसरणी अधोरेखित केली आहे. दादासाहेब फाळके यांच्यासारखे चित्रपटसृष्टीचे जनक महाराष्ट्रात झाले. वैज्ञानिक संशोधनामध्ये होमी भाभा यांनी भारतात अणू विज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली. भाभा अनुसंधान केंद्र असेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च,  टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे सर्व महाराष्ट्रात आहे. पुण्यामध्ये अनेक शिक्षण संस्था व संशोधन केंद्रे आहेत. मागील काही दशकात महाराष्ट्रातील प्रमुख शहरात औद्योगिक वसाहती, सेवा क्षेत्र. महामार्ग, टोलेजंग इमारती, मल्टिप्लेक्स, पंचतारांकित हॉटेल, यामुळे राज्यात समृद्धी निर्माण झाल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रासमोरील आव्हाने

आज महाराष्ट्रासमोर अनेक आव्हाने आहेत. कोरोना महामारीमुळे सर्वच संदर्भ बदलले आहेत. येणाऱ्या काळात आर्थिक धोरण आखून राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत त्याचे लाभ कसे पोहोचतील हे ठरवण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे.

एका बाजूला समृद्धी दिसून येत असताना दुसऱ्या बाजूला पाणीटंचाई, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, कमी प्रमाणात रोजगार निर्मिती, कुपोषण, बकाल शहरे, वाढत्या झोपडपट्ट्या आणि त्याच्या पुनर्विकासाचा प्रश्न, नागरी सुविधा, घनकचरा व्यवस्थापन ही नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. राज्याचे तीन चतुर्थांश उत्पन्न हे मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, रायगड या जिल्ह्यातून येतं. यामुळे मराठवाडा, विदर्भ, खान्देश कोकण, उत्तर महाराष्ट्र यामध्ये अन्यायाची भावना आहे. या असमतोल विकासामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढलेले असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री चव्हाण पुढे म्हणाले, आपल्या राज्यात युवा मनुष्य बळ, समाधानकारक पायाभूत सुविधा, वित्तपुरवठा, गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्था, जोडीला इंग्रजी भाषा आणि गणित यांच्या आधारे महाराष्ट्राने नॉलेज एकॉनोमीकडे वाटचाल करायला सुरुवात केली पाहिजे. त्यांनी सार्वजनिक शिक्षण व आरोग्य यावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आवश्यक असल्याचेही सांगितले.

तीन प्रमुख आव्हाने…

वाढते व अनियोजित नागरीकरण, शाश्वत शेती व युवकांची वाढती बेरोजगारी ही तीन सर्वात मोठी आव्हाने महाराष्ट्रासमोर असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी आणि कालव्याऐवजी जलवाहिनीद्वारे जल वितरण करावे असा सल्लाही त्यांनी दिला.

आयात-निर्यात करण्यावर भर देताना त्यांनी शेतकरी निर्मित कंपन्या जिल्ह्या- जिल्ह्यामध्ये सुरु होण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारने कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

रोजगार वाढविण्यासाठी महाराष्ट्रात नवीन उद्योग आकृष्ट करण्यामध्ये कमी पडतो आणि यात मूलभूत संशोधन व्हायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी आदिवासी भागातील कुपोषण या विषयावरही भाष्य केले. श्री. चव्हाण यांनी नव्या पिढीला आणि नव्या राजकर्त्यांना महाराष्ट्रात प्रचंड मोठी संधी असल्याचे सांगितले. त्यांनी कोरोनानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचे आव्हान नवे नेतृत्व नक्कीच पेलू शकेल, असा विश्वासही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठींबा.

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन...

उद्योगांच्या तत्पर वीजसेवेला महावितरणच्या ऑनलाइन ‘स्वागत सेल’ पोर्टलने नवी ऊर्जा

तक्रार निवारणाचा वेगही सुसाट; दर्जेदार सेवेचे दमदार पाऊल २७८ औद्योगिक संघटना...

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...