पुणे : राज्यातील पर्यटन स्थळांची एकाच ठिकाणी माहिती देणाऱ्या पर्यटन दालनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी येथे उदघाटन झाले.
हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील इन्फोसिस कंपनीच्या आवारात या दालनाचे उद्घाटन झाले. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन आदी उपस्थित होते.
इन्फोसिसमधील फुड कोर्ट क्रमांक तीनमध्ये असलेल्या या दालनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपप्रज्वलनाने उद्घाटन केले. त्यांनी दालनात फेरी मारून उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती घेतली.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना राज्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी या दालनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. याठिकाणी पर्यटकांना पर्यटनाशी निगडीत विविध सोयीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रवास, निवास, प्रवास विमा, पर्यटन स्थळांची माहिती आदींबाबतच्या सुविधा एकाच ठिकाणी पुरविल्या जाणार आहेत, असे एमटीडीसीचे पराग जैन यांनी सांगतिले. यावेळी एमटीडीसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, ओयो समूह, इमॅजिका, लवासा आदी पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांसोबत करार करण्यात आला.
यावेळी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, एमटीडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वैशाली चव्हाण, इन्फोसिस कंपनीचे रामदास कामत, प्रफुल्ल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी सुप्रीम हॉलिडेज कंपनीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश सुप्रीम ग्रुपचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.