मुंबई : पर्यटन विकासामुळे विविध बाबींचे आदानप्रदान वाढून भारत व जपानमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
जपानमधील वाकायामा प्रशासकीय विभागाच्या (प्रेफेक्चर) शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सह्याद्री अतिथीगृह येथे वाकायामाच्या शिष्टमंडळासोबत पर्यटन, फलोत्पादन क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला पर्यटन राज्यमंत्री प्रा.राम शिंदे, वाकायामाचे व्हॉईस गव्हर्नर हिरोशी सिमो, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, जपान आणि महाराष्ट्रादरम्यान मैत्रीचे संबंध अधिक दृढ होत आहेत. जपानने विविध क्षेत्रात केलेली प्रगती प्रेरणादायी आहे. जपानशी झालेले पर्यटनासंदर्भातील करार यापुढेही चालू ठेवण्यात येतील. फलोत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. भविष्यात फलोत्पादन क्षेत्रात करार करणे शक्य आहे.
व्हाईस गव्हर्नर हिरोशी सीमो म्हणाले, पर्यटन विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील आठ पर्यटन कंपन्या लवकरच जपानमधील पर्यटनस्थळांची पाहणी करणार आहेत. टोकियोमध्ये जपानी पर्यटन केंद्राला जोडूनच एक भारतीय पर्यटन कक्ष सुरु आहे. अशा प्रकारचे एक पर्यटन कार्यालय औरंगाबाद येथे सुरु करण्याचा मानस आहे. राज्यातील जास्तीत जास्त पर्यटकांनी येऊन निसर्ग सौंदर्याचा, उत्तम पर्यटन स्थळांचा आनंद लुटावा असे आवाहन त्यांनी केले.