बारामती : इंदापूर तालुक्यातील 16 गावांच्या पाणीपुरवठा योजना तरंगवाडी तलावावर अवलंबून आहेत. या तलावातील गाळ काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
खडकवासला धरणातून इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलावात सोडण्यात आलेल्या पाण्याचे पूजन श्री. बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री. बापट बोलत होते. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, आमदार राहूल कुल, इंदापूरचे नगराध्यक्ष अशोक इदगुडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, कार्यकारी अभियंता बी.बी. लोहार, प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार वर्षा लांडगे, उपअभियंता श्री.देवकाते, बारामतीचे उपअभियंता ए.आर. भोसले उपस्थित होते.
श्री. बापट म्हणाले, राज्यासह पुणे जिल्ह्यात यावर्षी पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबरोबरच पाण्याचे योग्य नियेाजन करणे आवश्यक आहे. निसर्गाशी मानव कधीही संघर्ष करु शकत नाही. त्याला निसर्गाशी जुळवून घ्यावेच लागते. तरंगवाडी तलावामुळे इंदापूर तालुक्यातील 16 गावांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने तलावाची साठवण क्षमता कमी झाली आहे. या तलावातील गाळ काढण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, मात्र या कामासाठी लोकसहभागही महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार श्री. भरणे, श्री. कुल, अतुल कपोले यांची भाषणे झाली.
दरम्यान, पालकमंत्री श्री. बापट यांनी आज हवेली तालुक्यातील शिंदवणे, दौंड, तालुक्यातील वरवंड येथील साठवण तलावाची पाहणी केली. यावेळी शिंदवणे येथील साठवण तलावातील गाळ काढावा आणि साठवण क्षमता वाढवावी अशा सूचना तहसीलदार आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
श्री. बापट यांनी दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावासही भेट देऊन पाहणी केली. दौंड शहराचा वाढता विस्तार पाहता सदरच्या तलावाची क्षमता वाढवावी आणि पाणी शुद्धीकरणाची क्षमताही वाढेल, यासाठी नगरपालिकेने प्रयत्न करावा, अशा सूचना दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी आमदार बाबूराव पाचर्णे, आमदार राहुल कुल, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार आदी उपस्थित होते.