पीएमआरडीएच्या बैठकीत विविध प्रस्तावांना मंजुरी
पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यान टाकण्यात येणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या शिवाजीनगर ते न्यायालयीन इमारत परिसरापर्यंतच्या वाढीव मार्गास पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली.
यशदा येथे झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त महेश झगडे, नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाजवळून अन्य मेट्रो मार्ग जाणार असल्याने नागरिकांच्या सोईसाठी सध्या मंजूर करण्यात आलेल्या मेट्रो मार्गाच्या वाढीव मार्गास मान्यता देण्याबरोबरच पीएमआरडीएतर्फे हाती घेण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी राज्य व केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या विविध तज्ज्ञ संस्थांच्या सेवा घेण्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सध्या पीएमआरडीएचे कार्यालय खाजगी जागेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित केलेल्या दराने या इमारतीची भाडे निश्चिती, प्राधिकरणातील अधिकारी व संस्थांच्या कौशल्य विकासासाठी उपाययोजना करणे, प्राधिकरण क्षेत्रात गस्त घालणे व अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवणे यासाठी नवीन वाहने खरेदी करणे, अनियमित व अनधिकृत बांधकामांना दंड ठोठावणे व त्याबद्दलचे शुल्क निश्चित करणे, कार्यालयीन कामकाजासाठी संगणक यंत्रणा खरेदी करणे, खाजगी सहभागातून पीएमआरडीएची कामे पूर्ण करणे, कंत्राटी तत्वावर कर्मचारी नियुक्त करणे आदी विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली.
आगामी 50 वर्षांचा विचार करता हा प्रकल्प अतिशय उपयुक्त असून यामुळे पुण्याच्या विकासाला गती येईल आणि विकासात भर पडेल, असे पालकमंत्री श्री.बापट यांनी सांगितले. त्यांनी प्राधिकरणाच्या कामकाजाबाबत काही सूचना केल्या.

