पुणे : राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पारंपरिक माध्यमाबरोबरच आधुनिक माध्यमांचाही प्रभावी वापर करा, अशा सूचना माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी दिल्या.
महासंचालक ओक यांनी विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयास भेट दिली. त्यानंतर त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संचालक (वृत्त-माहिती) शिवाजी मानकर, उपसंचालक यशवंत भंडारे उपस्थित होते.
महासंचालक ओक यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. ही माहिती पोहोचण्यासाठी प्रसारमाध्यमे अतिशय उपयुक्त माध्यम आहे. पारंपरिक माध्यमांच्याद्वारे समाजात योजनांची माहिती पोहोचविली जातेच. पण त्याचबरोबर योजनांची माहिती अधिक जलदगतीने आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियासारख्या आधुनिक माध्यमांचाही वापर करावा.
राज्य शासनाने टंचाईबाबत अनेक उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांची प्रभावी प्रसिद्धी करा. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून याबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करा, अशा सूचनांही त्यांनी केल्या.
शासनाच्या विविध योजना, उपक्रम, विविध अभियान, प्रशासकीय सुधारणा आणि नवनवे उप्रकम यांची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी मोहिम राबवा, अशा सूचना संचालक शिवाजी मानकर यांनी दिल्या. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विकासकामांची माहिती होण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे दौरे आयोजित करा, असेही त्यांनी सांगितले.
महासंचालक ओक आणि संचालक मानकर यांचे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांनी स्वागत केले. यावेळी सहाय्यक संचालक आकाश जगधने, माहिती सहाय्यक संग्राम इंगळे यांच्यासह विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
महासंचालक ओक यांची एनएफएआयला भेट
तत्पुर्वी महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी नॅशनल फिल्म आर्काईव्हज ऑफ इंडियाला भेट दिली. या संस्थेत सुरू असलेल्या नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनचे विशेष कार्याधिकारी संतोष अजमेरा यांनी मिशनबाबत सविस्तर माहिती दिली. श्री. ओक यांनी चित्रपटांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी संचालक शिवाजी मानकर, उपसंचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत उपस्थित होते.