मुंबई- मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्यामुळे राज्य परिवहन विभागाच्या 2 एसटी बसेस वाहून गेल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.
मुंबई गोवा महामार्गावर महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळण्याची घटना काल (2 ऑगस्ट) रात्री 11.30 वाजता घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक तत्काळ घटनास्थळी गेले होते. त्या भागात प्रचंड पाऊस होता. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक माहिती मिळताच घटनास्थळी निघाले होते. प्रत्यक्षदर्शीने 14-15 गाड्या वाहून गेल्याचे सांगितले परंतु चौकशीअंती सदरची व्यक्ती नशेत होती. दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने दोन एस. टी. बसेस वाहून गेल्याचे सांगितले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
घटनेच्या शोधकार्यासाठी एक एअरफोर्सचे व एक कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर महाड येथे पोहोचले असून एनडीआरएफच्या 2 टीम ज्यामध्ये 40 जवान, स्वीमर बोट आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा तेथे पोहोचली होती. सावित्री नदीवरील हा पूल ब्रिटीशकालीन होता. या पुलास पर्यायी पूल तयार करण्यात आला होता. यावर 2001 पासून वाहतूक सुरु केली होती. हा पूल वाहतुकीस योग्य असल्याची तपासणी मे 2016 मध्ये केली होती. घटनास्थळी शोध व मदत कार्य सुरु असल्याची माहिती महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

