पुणे-महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जत्रा म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा
,खरेदीचा, भेटीगाठीचा, सांस्कृतिक आदान प्रदानाचा एक सणच आसतो. ग्रामीण संस्कृतीचा
शहरांशी संवाद सोहळा म्हणून भीमथडी जत्रा नावारूपाला आली.गेल्या १२ वर्षापासून
पुण्यात कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर मैदानावर अग्रीकल्च्ररल डेव्हलपमेंट ट्रस्ट
बारामती, शारदा महिला संघ भीमथडी जत्रेचे आयोजन करत आहे. आज भीमथडी जत्रेचा
शेवटचा दिवस असून पुणेकरांनी मोठ्या संखेने भीमथडी जत्रेत सामील व्हावे असे सयोजकांतर्फे
आवाहन करण्यात येत आहे. बचत गटातील महिलांनी बनविलेली दर्जेदार उत्पादने, हस्तकला
वस्तू, महाराष्ट्राचे अस्सल खाद्य पदार्थ, शेतकरी ते ग्राहक थेट संवाद, आणि ग्रामीण संस्कृतीचे
दर्शन या सर्व बाबींचा पुणेकरांना एकाच छताखाली आनंद घेता येतो.
नाताळाची सुट्टी आणि अंगारकी चतुर्थी अशा दुहेरी संगमात काल भीमथडी जत्रेत
शाकाहारी पदार्थांची पुणेकरांनी लयलूट केली. खानदेशी मांडे , गावरान तुपातील गरम गरम
जिलेबी, पुरणपोळी, खपली गव्हाची लापशी, हुरड्याचे थालीपीठ, झणझणीत पिठल भाकरी,
जळगावचे अस्सल भरीत, पातोडी रस्सा, हुलग्याची शिंगोळी, खवा पोळी आदि पदार्थांवर
पुणेकर ताव मारताना दिसले.
अंगारकी मुळे सदाफुली बचत गटाच्या साधा मोदक, आंबा मोदक, स्त्रोबेरी मोदक व चोकलेट
मोदकांना प्रचंड मागणी होताना दिसत होती असे या गटाचे चालक श्री भारती मेढी- कर्वेनगर
यांनी सांगितले. शेतकरी बाजार मधील लाकडी घाण्यावरील शेंगदाना तेल, बदाम व तिळाचे
तेल, काळ्या तिळाचे तेल, जवस तेल या विविध तेल प्रकाराला ग्राहकांची पसंती मिळत होती.
या वर्षी भीमथडी जात्रेतील शेतकरी बाजार या विभागातील गावरान गव्हांकुर चूर्ण, हातसडी
तांदूळ, सेंद्रिय चिक्कू व पेरू, मलबेरीचे पदार्थ, कोल्हापूरी गुळ पावडर, गावरान हींग पावडर,
देशी गायीचे गोमुत्र , नाचणी, नागली व बिबडी पापड आदि पदार्थ पुणेकरांचे आकर्षण ठरले.
शेतकरी बाजार मधील हर्बल प्रोडक्ट, घाण्यावरील तेल , सेंद्रिय पद्धतीने उत्पादित पेरू,
डाळिंब व बोर आदींची मागील चार दिवसातील एकूण उलाढाल साधारणपणे ६,००,०००/-
आसपास होताना दिसत आहे.

