मोरेश्वर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ मैफलीचे आयोजन
पुणे : विदुषी मंजिरी कर्वे-आलेगावकर यांनी रंगवलेला राग श्री, हंसध्वनी, नंद यांसह तराणा आणि निर्गुणी भजनाने गायन मैफलीत रंग भरले. निमित्त होते ते कलासक्त सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित सुश्राव्य मैफलीचे.
मैफलीचे आयोजन पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. मंजिरी आलेगावकर यांनी मैफलीची सुरुवात राग श्रीमधील ‘गरिब नवाज तुम हो साईयाँ’ या पारंपरिक बंदिशीने केली. याला जोडून गुरू आप्पा कानिटकर यांनी शिकविलेली आणि अंतुबुवा जोशी यांनी रचलेली ‘अर्धांगी गिरिजा गौरी’ ही द्रुत लयीतील बंदिश सादर केली. सुमधुर आवाज, त्यातील ठेहराव याने मैफलीत रंग भरले. विख्यात शास्त्रीय गायक पंडित कुमार गंधर्व यांच्या आठवणींना उजाळा देत कुमारजी आपल्या मैफलीच्या यशाचे रहस्य सांगताना शब्दांवरील आघातांना महत्त्व देत, असे सांगून श्री रागातील कुमारजींनी अजरामर केलेला ‘तनारे ना नी तोम् तन धीम्’ या तराणा अतिशय दमदारपणे सादर करून रसिकांना संमोहित केले.
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव राग नंद खुलवत नेताना मंजिरी आलेगावकर यांनी पंडित कुमार गंधर्व यांची ‘अजहून आए शाम’ ही रचना ऐकविली. ‘ढुंढू बारे सैंय्या तोहे सकल बन’ ही रचना सादर करताना आवाजातले माधुर्य आणि अलवार ताना घेऊन त्यांनी रसिकांची मने जिंकली.
कुमार गंधर्व यांचीच ‘अब तो आजा रे राजन’ ही रचनाही त्यांनी प्रभावीपणे सादर केली. यानंतर राग हंसध्वनी ऐकवताना मंजिरी आलेगावकर यांनी रामाश्रय झा रचित रूपक तालातील ‘सकल दु:ख हरन’ ही अतिशय भावपूर्ण रचना सादर केली. या बंदिशीच्या अर्थाला जुळणारी ‘नित सुमरन करे भोलानाथ असूर संहार’ ही स्वरचित बंदिश ऐकवून रसिकांना स्तिमित केले. यानंतर पंडित बबनराव हळदणकर यांनी रचलेला ‘त दे नानी तद रे तानी’ हा तराणा सादर केला.
पंडित कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेले संत कबिरांचे निर्गुणी भजन सादर करताना मंजिरी आलेगावकर यांनी त्या रचनेचा आशय उलगडून दाखविला. मनाला उद्देशून रचलेल्या ‘हीर ना समझ बुझ बन चरना’ या भजनाने त्यांनी मैफलीची सांगता केली. सुमारे दोन तास रंगलेली ही मैफल रसिकांना शास्त्रीय संगीताचा सुरेल आनंद देऊन गेली.
मंजिरी आलेगावकर यांना अरविंद परांजपे (तबला), सौरव दांडेकर (संवादिनी), डॉ. मृणाल वर्णेकर, गौतम हेगडे आणि प्राची जोगळेकर (सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली.
सुरुवातीस प्रास्ताविकात श्रीरंग कुलकर्णी यांनी मैफलीच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. तर विनिता आपटे यांनी संस्थेच्या कार्याविषयी अवगत केले.
कलाकारांचा सत्कार श्रीरंग कुलकण, माधुरी वैद्य यांनी केला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता आपटे यांनी केले.