पुणे- येरवडा परिसरात मंगळवारी एका 28 वर्षीय तरुणीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या झाली होती. आता या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात सदर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडल्याचे दिसून येत असून, तिथे बघ्यांची तोबा गर्दी असल्याचेही दिसत आहे. दुर्दैव म्हणजे या गर्दीपैकी कुणीही तिच्या मदतीला धावून गेले नाही.आरोपी आपल्या हातातील कोयता खाली टाकतो आणि त्यानंतर नागरिक त्याला मारण्यासाठी धावून जातात.असे व्हिडीओत दिसते आहे.
कृष्णा सत्यनारायण कनोजिया (30) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तर शुभदा शंकर कोदारे असे मृत तरुणीचे नाव आहे. हे दोघेही येरवडा परिसरातील एका नामांकित कंपनीत नोकरीस होते. कृष्णाने आर्थिक व्यवहारातून शुभदाची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मयत शुभदाने वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून कृष्णाकडून वेळोवेळी पैसे घेतले होते. पण हे पैसे ती वेळेवर परत करू शकली नाही. त्यामुळे कृष्णाने मंगळवारी तिच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे व्हिडिओत?
या घटनेचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात आरोपी कनोजिया हातात कोयता घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. तर मृत शुभदा कोदारे जखमी अवस्थेत खाली पडल्याचे दिसून येत आहे. याशिवाय घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी असल्याचेही व्हिडिओत दिसून येत आहे. आरोपी जखमी शुभदाच्या आसपास मोबाईल घेऊन फिरतोय. शुभदा गंभीर जखमी असतानाही मोबाईलवरून झाल्या प्रकाराची माहिती कुणालाही तरी देत असते. पण आरोपी तिच्याजवळील फोन हिसकावून घेताना व्हिडिओत दिसतो.उल्लेखनीय बाब म्हणजे घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. पण कुणीही आरोपी कृष्णाला अडवताना दिसून येत आहे. शेवटी आरोपी आपल्या हातातील कोयता खाली टाकतो आणि त्यानंतर नागरिक त्याला मारण्यासाठी धावून जातात. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.