मुंबई-वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर त्याच्यावर ईडी आणि पीएमएलए नुसार कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु आठ महिने झाल्यानंतरही त्याच्यावर कारवाई का झाली नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला केला आहे. अनिल देशमुख, संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली, तर मग वाल्मीक कराडवर कारवाई का झाली नाही? असाही सवाल केला. वाल्मीक कराडवर ईडीची कारवाई करावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.
वाल्मिक कराडच्या नावाने 2022 मध्ये नोटीस काढली होती. तसेच आठ महिन्यांपूर्वी अवधा कंपनीकडून एफआयआर झाला असताना वाल्मिक कराडवर कारवाई का नाही? अशीच खंडणीची प्रकरणे होणार असतील, तर महाराष्ट्रात कोण गुंतवणूक करेल, असेही त्या म्हणाल्या. आम्ही राज्यकर्ते असल्यामुळे आम्हाला न्याय देऊ नका, पण कंपनीने वाल्मीक कराडवर खंडणीची केस दाखल केलेली असल्यामुळे कंपनीला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
6 महिन्यांपूर्वी कराडाविरोधात तक्रार दाखल झाली होती. मग त्याच्यावर ईडीची कारवाई का झाली नाही? अनिल देशमुख, संजय राऊत आणि नवाब मलिक यांना एक कायदा आणि वाल्मीक कराडला वेगळा कायदा का? याचे उत्तर सरकारने द्यावे. हा विषय मी आणि बजरंग सोनवणे 30 तारखेला संसदेच्या अधिवेशनात मांडणार असून याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनाही याबाबत विचारणा करणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
लाडकी बहीण योजनेच्या परळीचे तालुकाध्यक्ष वाल्मीक कराड आहेत. ही योजना लोकसभा निवडणुकीनंतर आली. वाल्मीक कराडवर लोकसभेच्या आधीच खंडणीचा गुन्हा दाखल होता. खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या माणसाला महिलांसाठीच्या लाडकी बहीण योजनेच्या कमिटीचा अध्यक्ष करता, हे असंवेदनशील आणि धक्कादायक आहे.
अशोक चव्हाण यांनी नैतिकतेने राजीनामा दिला होता. अशी देशात किती तरी उदाहरणे देशात झालेली आहे. एक काळा असा होता, की एखादा रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे मंत्री राजीनामा द्यायचे. त्यामुळे नैतिकतेच्या आणि लोकांच्या भावनांचा आदर ठेवून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येला आज 30 दिवस पूर्ण झालेत. संतोष देशमुख यांच्या मुलीचे अश्रू बघून अस्वस्थ वाटते. माणुसकी राहिली की नाही? सरकारमध्ये काही संवदेनशीलता राहिली का नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. भाजप आणि त्यांच्या काही मित्रपक्षात आजही संवेदनशील नेतृत्व आहे. सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांनी हे प्रकरण लावून धरले आहे, हा आशेचा किरण आहे, असेही त्या म्हणाल्या.