दिल्ली-दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय पातळीवर ‘I.N.D.I.A.’ आघाडी एकत्र नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या आधी देखील उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील केजरीवाल यांच्या विरोधातील भूमिकेला विरोध दर्शवला होता. तसेच दैनिक सामनाच्या माध्यमातून देखील काँग्रेसचे कान टोचण्यात आले होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 जागांसाठी एकाच टप्प्यात पाच फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या वेळी दिल्लीमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्या तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दिल्लीमध्ये एकही जागा मिळाली नव्हती. तर केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पूर्ण बहुमत मिळवले होते. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या संदर्भातील माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. दिल्लीच्या निवडणुकीत सपा देखील आम आदमी पक्षाचा प्रचार करणार आहे. त्या पाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने देखील असाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीत एकही खाते उघडू न शकणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत देखील याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस आणि आपमध्ये युती झाली असती तर बरे झाले असते, पण कदाचित तसे होताना दिसत नाही. दिल्लीत काय चालले आहे. ते महाराष्ट्रात बसून सांगणे कठीण आहे, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील म्हटले आहे. या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘दिल्लीची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. काँग्रेसही निवडणूक लढवत आहे. मला वाटते कदाचित तिथे केजरीवाल जिंकतील. महाराष्ट्रात तीन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. कराड दक्षिणमधून ते निवडणूक रिंगणात उतरले होते. या जागेवरून भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला होता.