नामांकित शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर मुलींचे कपडे बदलताना ….
पुणे-पुण्यातील एका शाळेतील शिपायानेच मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेऊन रेकॉर्डिंग केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार पुणे येथील पाषाण भागात असलेल्या एका नामांकित शाळेत घडला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिपायाला अटक करण्यात आली आहे.आरोपी शिपायाने त्याचा गुन्हा कबूल केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत शिपाई सरोदे याला अटक केली आहे. आरोपींच्या विरोधात पोक्सो सह बी.एन.एस कलम 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथील एका नामांकित शाळेत मुलींच्या चेंजिंग रूममध्ये स्विच बोर्डवर मोबाईल ठेऊन मुलींचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले आहेत. हा सगळा प्रकार शाळेतीलच शिपाई तुषार सरोदे याने केला आहे. 6 जानेवारी रोजी शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी शाळेतील किचन रूममध्ये ड्रेस बदलण्यास गेल्या. तिथे आरोपी शिपाई उपस्थित होता. विद्यार्थिनींनी त्याला तिथून जाण्यास सांगितले असता त्याने त्याचा मोबाईल कॅमेरा सुरू ठेऊन रूममध्येच एका स्विच बोर्डवर ठेवला. हा प्रकार काही मुलींच्या लक्षात आला आणि तातडीने त्यांनी व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट केला.
हा संपूर्ण प्रकार मुलींनी आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेतील मुख्याध्यापिका यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिपाई सरोदे याला विचारले असता त्याने देखील त्याच्या चुकीची कबुली दिली. हा सगळा प्रकार शाळेच्या व्यवस्थापनाला समजला तेव्हा त्यांनी शिपायची चौकशी केली तेव्हा त्याने त्याचा मोबाईल हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठीच ठेवला असल्याचे त्याने कबूल केले.