पुणे – ८ जानेवारी २५
भारतीय संस्कृती संगम, पुणे गेल्या ४० वर्षांपासून विविध सामाजिक आणि अध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करीत आली आहे.
ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता, उपनिषदे अशा धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथ आणि संतसाहित्यावर आधारित सर्व वयोगटांसाठी अभ्यासवर्ग आणि कार्यशाळा असे उपक्रमांचे स्वरूप असते. या व्रतातूनच ‘दास-नवमी’ उत्सवा समावेत कीर्तन आणि व्याख्यानमाला सुरु झाली आणि ती अविरत गेली ३४ वर्षे सुरु आहे.
ह्या उत्सवाच्या व्याख्यान मालिकेत महाराष्ट्रातील प्रतिथयश व्याख्याते आणि जाणकार श्रोतृ वर्गाची मांदियाळी असते, अशी माहिती भारतीय संस्कृती संगमचे विश्वस्त गोविंद बेडेकर यांनी दिली.
यंदापासून ‘दासनवमी’ व्याख्यानमाले बरोबर ‘सांस्कृतिक व्याख्यानमाला’ आयोजित केली आहे, जी येत्या १० जानेवारी पासून तीन दिवस सायंकाळी ५:३० ते ७:३० पर्यंत चालेल,अशी माहिती भारतीय संस्कृती संगमचे विश्वस्त गोविंद बेडेकर व सुहास क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
ही सांस्कृतिक व्याख्यानमाला आयडियल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने घेतली जाणार असुन आयडील कॉलनी क्रीडांगणावर होणार आहे. यामध्ये भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारी व्याख्याने होणार आहेत.
या व्याख्यानमालेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल:-.
पुष्प पहिले:
शुक्रवार, दि. १० जानेवारी
हिंदू संस्कृती परंपरा आणि विज्ञान
वक्ते: श्री. राहुल सोलापूरकर (सुप्रसिद्ध अभिनेते व व्याख्याते)
अध्यक्ष: श्री संजय चोरडिया (चेअरमन सूर्यदत्त इन्स्टिट्यूट)
पुष्प दुसरे:
शनिवार, दि. ११ जानेवारी
संतांची सामाजिक समरसता
वक्ते: विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर
अध्यक्ष: प्रा.डॉ. सुरेश गोसावी (मा.कुलगुरू, पुणे विद्यापीठ)
पुष्प तिसरे:
रविवार, दि. १२ जानेवारी
स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत
वक्ते: श्री. अविनाश धर्माधिकारी (माजी सनदी अधिकारी)
अध्यक्ष: श्री जयंत उमराणीकर (निवृत्त पोलीस महासंचालक).
ही व्याख्यानमाला आयडील कॉलनी क्रीडांगणावर होणार आहे.
भारतीय संस्कृती संगम
पूर्व सेना अधिकारी शिवाजीराव चौधरी यांच्या प्रेरणेने सुरु झालेली भारतीय संस्कृती संगम, पुणे, या संस्थेने गेल्या ४० वर्षांपासून ‘दासबोध’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘गीता’ आणि ‘उपनिषद’ यावर व्याख्याने व वर्ग आयोजित केले आहेत.
या संस्थेचे उद्दिष्ट भारतीय संस्कृतीचे सखोल ज्ञान समाजात रूजवणे आणि त्यावर ठराविक विचारधारांचे आदान-प्रदान करणे आहे.
त्याचप्रमाणे, ह्या संस्थे कडून अत्यंत प्रेरणादायी आणि शास्त्रज्ञान वर्धक व्याख्यानमाला शृंखलेचे आयोजन गेली ३४ वर्षे होत आहे. या व्याख्यानमालेत भारतीय संस्कृती,तत्त्वज्ञान, आणि धर्माशी संबंधित विविध गोष्टींवर अद्वितीय आणि सखोल संवाद साधला जातो.
संस्थेला गोविंद बेडेकर, विद्यावाचस्पती डॉ कल्याणी नामजोशी सारखे विद्वान विश्वस्त लाभले आहे.
संस्था श्री दासनवमी उत्सव व्याख्यानमाला व्यतिरिक्त शारदीय देशभक्तीपर व्याख्यानमाला, समर्थांची तत्त्वज्ञानावर आधारित हेमंतीय व्याख्यानमाला, आणि कीर्तन मालिका सारखे उपक्रम वेळो-वेळी घेत असते.
त्यातच आता ‘सांस्कृतिक व्याख्यानमालेचे’ भर पडली आहे.