पुणे : विविध रंगाची उधळण करीत साकारलेली निसर्गचित्रे…दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या चेहऱ्यावरील बारीक भाव टिपत काढलेली व्यक्तीचित्रे…पेन्सिल शेडिंग सारख्या माध्यमांमध्ये साकारलेली विविध वस्तूंची मनमोहक चित्रे…अशा विविध चित्रांचा चित्राविष्कार आणि विविध शैलींनी नटलेले चित्रप्रदर्शन बघण्याची संधी पुणेकरांना मिळाली.
‘आर्टफॅन्स’ या हौशी चित्रकारांच्या समूहाचे ‘रंगोत्सव’ हे प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन मोनिका मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
प्रदर्शनात १४ कलाकारांच्या ७० कलाकृती सादर केल्या जातील. या कलाकृतींमध्ये निसर्गचित्रे, म्युरल्स आणि स्टिल लाईफसारख्या विविध शैलींचा समावेश असून, त्या ऑइल, ऍक्रेलिक, तसेच पेन्सिल शेडिंगसारख्या माध्यमांमध्ये साकारण्यात आल्या आहेत. मागील आठ वर्षे चित्रकलेत नवनवे प्रयोग करणाऱ्या या चित्रकारांमध्ये २२ वर्षांच्या तरुणांपासून ७५ वर्षांच्या अनुभवी चित्रकारांचा समावेश आहे.
प्रदर्शनात वैदेही दाबक, नितीन महानव, शैला कारखानीस, उल्हास भानू, आल्हाद नाईक, मृदुला धोंगडे, हेमांगी गोरे, जयश्री बेडेकर, स्वाती कुट्टे, संगीता ताकवले, कविता ठाकरे, नेहा पाटील, माधवी दिवेकर, मिताली देशपांडे आणि श्रीकला राव या कलाकारांची चित्रे आहेत. दिनांक १२ जानेवारी पर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ यावेळेत राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन रसिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
‘आर्टफॅन्स’ – चित्रकलेवरील प्रेमाने एकत्र आलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील आणि क्षेत्रातील कलाकारांनी ‘आर्टफॅन्स’ हा समूह स्थापन केला. सुरुवातीला एकत्र येऊन चित्रे पाहणे, त्यावर चर्चा करणे, आणि आपल्यालाही अशा प्रकारे चित्र काढता येईल का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना या कलाकारांचा प्रवास सुरू झाला. सन २०१८ मध्ये मुंबईतील नेहरू आर्ट गॅलरीत समूहाला स्वतःचे पहिले प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. या प्रदर्शनाच्या यशात उल्हास भानू यांचे मोलाचे योगदान होते. त्यानंतर पुण्यातील पी.एन. गाडगीळ औंध, ग्लिंप्स, बालगंधर्व कलादालन यांसारख्या ठिकाणीही ‘आर्टफॅन्स’ ने आपली कला सादर केली. मात्र, ही प्रदर्शने इतर कलाकारांच्या समूहासोबत होती. तेव्हापासून आर्टफॅन्स ला पुण्यात आपले स्वतंत्र प्रदर्शन सादर करण्याची इच्छा होती. त्या प्रमाणे यंदाचे चित्रप्रदर्शन पार पडणार आहे.

