सहस्त्रचंद्र वर्ष निमित्ताने आयोजन
पुणे : शुक्रवार पेठ भाऊ महाराज बोळ येथील श्री दशानेमा मंगल कार्यालय गोपाळ कृष्ण मंदिराच्या सहस्त्रचंद्रवर्ष निमित्त भव्य कलश यात्रा काढण्यात आली. सर्व पुरुष, महिलांनी व लहान मुलांनी पारंपारिक वेश परिधान केलेला होता. तब्बल ८१ महिलांनी कलश डोक्यावर घेतला होता तसेच पुरुषांनी पगडी घातली होती.
मुख्य कलश तसेच मुख्य यजमान रविराज शेठ हे सजविलेल्या रथामध्ये बसले होते. फुगड्या, गरबा तसेच गोपाल कृष्णाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सुरुवातीला बँड, पुष्पवृष्टी तसेच आकर्षक फटाक्यांनी यामध्ये अधिकच भर पडली. सर्वांच्या गळ्यामध्ये राधाकृष्ण लिहिलेले भगवे उपरणे होते. त्यामुळे प्रदक्षिणेला एक वेगळीच शोभा आली.
मंदिर कलश प्रदक्षिणेनंतर ८१ यजमानांच्या हस्ते लवकरच मंदिराची वास्तू नवीन स्वरूपात व्हावी, याकरता संकल्प सोडण्यात आला व त्यानंतर सत्यनारायण महापूजेला सुरुवात झाली. सत्यनारायण कथेनंतर गुरुजी जयप्रकाशजी गोर शुक्ला यांनी महाआरतीला प्रारंभ केला व नंतर सर्व ज्ञाती बांधवांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.