इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण प्रगतीकरिता शासन कटिबद्ध असून वेळ पडल्यास…
कोल्हापूर, : पत्रकार दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे या उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की, “पत्रकारांकडून समाजातील कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान केला जातो हा आदर्शवत उपक्रम आहे. इचलकरंजीत दूषित पाण्याचा प्रश्न सातत्याने निर्माण होतो, ही बाब भूषणावह नाही. याबाबत पुढील काळात राज्य शासनाच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.’
इचलकरंजीकरांचे पुढे कौतुक करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “हे शहर कला, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून या शहराला भारताचे मँचेस्टर असे संबोधले जाते, हे या शहराने औद्योगिक क्षेत्रात केलेल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे.”
यावेळी त्यांनी पुरस्कार प्राप्त सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. यापुढेही इचलकरंजी शहरातील इतर व्यक्ती क्रीडा, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर शहराचे व जिल्ह्याचे नाव लौकिक करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
“इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण प्रगतीकरिता शासन कटिबद्ध असून वेळ पडल्यास अस्तित्वात असलेले कायदे व नियमात बदल केले जातील तसेच, जीएसटी परताव्याच्या थकबाकीचा विषय असो अथवा इतर कोणताही कायदेशीर विषय असो त्याकरिता गरज पडल्यास नवीन अध्यादेश काढण्यास शासन कचरणार नाही”, असेही यावेळी डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी स्पष्ट केले व त्याची ग्वाही दिली.
आज पत्रकार दिनानिमित्त जो पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे याचे त्यांनी कौतुक केले. तसेच लोकशाहीमध्ये पत्रकारिता व पत्रकार हा स्वतंत्र चौथा आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित केले.
यावेळी पत्रकारांसंदर्भात मोलाचे वक्तव्य करताना उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “पत्रकारांसाठी नवीन निवासी संकुलांची उभारणी करणे अथवा अस्तित्वात असलेल्या निवासी संकुलांचा पुनर्विकास करणे व अशा प्रकारे या संकुलामध्ये पत्रकारांचा समावेश करणे हा शासनाच्या ध्येय धोरणात अंतर्भूत असून, याकरिता मी स्वतः मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रयत्न करेन.
त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकारांसाठी पेन्शनबाबत एक सुटसुटीत नियमावली तयार केली जावी याकरिता सर्व पत्रकार बंधूंनी वित्त विभागाशी संपर्क साधून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे व योग्य ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन कशी मिळेल याकरिता सर्व पर्यायांची खातरजमा करावी. तसेच, सर्व वृत्तसमूहांनी आपल्याकडील ज्येष्ठ पत्रकारांची यादी शासनाकडे सादर करावी जेणेकरून पत्रकारांना पेन्शन मिळणे व त्यांची शासन स्तरावर ओळख होणे सोपे जाईल. यासर्व बाबींवर मी स्वतः शासन व्यवस्थेतील सर्व संबंधित अधिकारी व पत्रकारांचे प्रतिनिधी यांच्यासोबत लवकरच एक बैठक घेईन.”
या कार्यक्रमाला इचलकरंजीचे आ. राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे या सर्वांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती.