- भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरु होणार
- केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारने प्रक्रियेला वेग
- मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्यात आढावा बैठक
- भूसंपादन प्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांकडून एमआयडीसीला भूसंपादनाचे निर्देश
- मार्च २०२९ पर्यंत विमानतळ साकारण्याचे उद्दिष्ट
पुणे –
गेली काही वर्षे प्रतिक्षेत असणाऱ्या पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती येणार असून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुढील प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत डीपीआर अंतिम करण्यात येणार असून भूसंपादनाची प्रक्रिया एमआयडीसीला सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे विमानतळाच्या कामाचे लवकरात ‘टेक ॲाफ’ होणार आहे. तसेच मार्च २०२९ पर्यंत हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सर्व विमानतळाच्या विमानसेवा आणि विकासकामांसदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरीक हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. विमानतळाच्या विकासकामांना आणखी वेग देण्यासंदर्भात आणि विमानसेवा आणखी सक्षम करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस भारतीय विमानतळ प्राधिकरण, सैन्य दल, महाराष्ट्र विमानतळ महामंडळाचे, सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र असून या क्षेत्रातील वाढ विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनी अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार असून विमानतळाचा डिपीआर सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिवाय मार्च २०२९ पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.’
‘पुणे आणि परिसराचा विकास झपाट्याने होत असून विमान प्रवाशांची आणि हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे सध्याचे विमानतळ सुसज्ज आणि अत्याधुनिक सोईसुविधांसह सज्ज केलेले आहे. तरीही पुणे शहर आणि परिसराच्या भवितव्याचा विचार करता पुरंदर विमानतळ पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टी वाढवण्यासाठीचा OLS पूर्ण झाले असून भूसंपादन येत्या ६ महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढवण्यात मदत होऊन पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बैठकीत चर्चा झालेले मुद्दे…
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम नियोजित वेळेत अर्थात मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करणे. मार्च २०२५ ला देशांतर्गत आणि एप्रिलला २०२५ आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याते नियोजन
- नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे रि-कार्पेटिंगचे काम गतीने करून दिलेल्या मुदतीत म्हणजेच ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करावे.
- अमरावती विमानतळ येथे नाईट लॅडिंगची सुविधा वेगाने पूर्ण करुन दक्षिण आशियातील सर्वात मोठा FTO जुलै २०२५ पर्यंत पूर्ण करणे.
- सोलापूर विमानसेवा लवकर सुरु करणे आणि कोल्हापूर विमानतळ येथे धावपट्टी विस्तारिकरण करण्यासाठी लवकरात लवकर भू-संपादन करणे. तसेच दोन्ही विमानतळांवर नाईट लँडिंग सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करावी.
- जळगाव येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करण्याचा निर्णय
- गडचिरोलीचे येथे विमानतळ साकारण्यासाठी भूसंपादन सुरु करणे
- रत्नागिरी, गोंदिया, अकोला आणि संभाजीनगर विमानतळांच्या सुविधा आणि विमानसेवा संदर्भात सकारात्मक चर्चा
- पवना, गंगापूर, खिंडसी आदी धरणात Water Aerodrome साठीचे सर्वेक्षण तातडीने करावे.
- आंतरराष्ट्रीय बंदर असलेल्या वाढवण येथील प्रस्तावित विमानतळाबाबत लवकरत निर्णय घेण्यात येईल.