पुणे-फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या हनुमान टेकडीवर एका १७ वर्षीय महाविद्यालयीन मुलगी मित्रासाेबत फिरावयास गेली असताना, तिला अज्ञात आराेपींनी धारदार कोयत्याचा धाक दाखवून तिला मारहाण करत एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी सदर पिडित मुलीने डेक्कन पोलीस ठाण्यात अनाेळखी आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनाेळखी आराेपींवर जबरी चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगी ही एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ४ जानेवारी राेजी दुपारी दोन वाजण्च्या सुमारास तक्रारदार मुलगी आणि तिचा मित्र सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात फिरावयास गेलेले होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या अज्ञात चोरट्यांनी मुलगी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राला काेयत्याचा धाक दाखवून धमकावत शिवीगाळ केली. मुलीस मारहाण करुन चोरट्यांनी जबरदस्तीने मुलीच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोन्याची साखळी चोरून नेली. घाबरलेली मुलगी आणि तिचा मित्र या प्रकारानंतर त्या ठिकाणावरुन घरी गेले. त्यानंतर तिने पालकांशी चर्चा करुन याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेची माहिती समजल्यानंतर, डेक्कन पाेलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक एस सावंत पुढील तपास करत आहेत. हनुमान टेकडी परिसरात मागील दोन महिन्यात टेकडीवर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन युवकांना लुटल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. यापूर्वी देखील बाणेर-पाषाण रस्त्यावरील टेकडीवर फिरायला गेलेल्या ईशान्य भारतातील महाविद्यलायीन तरुणीस लुटण्यात आल्याची घटना घडल्यावर चतु:शृंगी पोलिसांनी चोरट्यांना अटक केली होती.

