पुणे : दिल्ली येथे होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास येण्याची इच्छा विदेशातील साहित्य प्रेमींनी व्यक्त केली आहे. संमेलनास येऊ इच्छिणारे विशेषत: पाकिस्तान, इंग्लड आणि अमेरिकेतील मराठी नागरिक आहेत, अशी माहिती साहित्य संमेलनाचे आंतरराष्ट्रीय समन्वयक डॉ. सतिश देसाई यांनी दिली.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळचे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्ली येथील छत्रपती शिवाजी साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडियम )येथे होत आहे. महाराष्ट्रातील साहित्य रसिकांनी ज्या प्रमाणे संमेलनास येण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्याच प्रमाणे विदेशातूनही रसिक येण्यास उत्सुक आहेत. संमेलनात कसे सहभागी होता येईल, अशी विचारणा त्यांच्याकडून होत आहे. संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने पाकिस्तानातील कराची येथील महाराष्ट्र मंडळाचे प्रतिनिधी विशाल राजपूत यांनी तसेच लंडन येथील सुजाता गोठस्कर आणि उत्तम शिराळकर यांनी साहित्य संमेलनास उपस्थित राहण्यासाठी विचारणा केली असल्याचे डॉ. देसाई म्हणाले.
दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी विदेशातून येण्यास इच्छुक असलेल्या विशेषतः पाकिस्तानातील कराची येथील मराठी भाषिक साहित्यप्रेमीं संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाच्या तसेच गृह मंत्रालयाच्या माध्यमातून योग्य ती शहानिशा करून निर्णय घ्यावा, अशी सूचना ज्येष्ठ नेते आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. विदेशातून साहित्य प्रेमींनी संमेलनास येण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी त्या बाबतचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि संयोजन समिती एकमताने घेईल, असे डॉ. देसाई म्हणाले.