पुणे: भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला पुणे विमानतळावर अटक झाली आहे. हैदराबादला जाण्यासाठी निघालेल्या दीपक काटेला पुणे विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं. आता तो विमानतळ पोलीस स्टेशनच्या अटकेत आहे. त्याच्याकडे १ पिस्तुल, २ मॅगझिन आणि २८ जिवंत काडतुसं सापडली आहेत. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर भाजप नेत्यांसोबतचे अनेक फोटो आहेत.ज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही समवेतच्या फोटोचा समावेश आहे .दिपक सिताराम काटे (32, रा. मु. पो. सराटी, ता. इंदापुर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत इंडिगो एअरलाईनमध्ये सिक्युरिटी एक्झ्युकेटीव्ह प्रिती लक्ष्मण भोसले यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे.
सुरक्षा अधिकारी प्रिती भोसले या विमानतळावर प्रवाशांचे बँगेज स्क्रिनिंगचे व तपासणीचे काम करत असताना, दिपक काटे हा पुणे विमानतळ येथे आला असता त्याची मशीनमध्ये बॅग तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या बँगेत मेटल डिटेक्ट झाल्याने त्याच्या बँगेत एका कॅरीबॅगमध्ये 7.65 कॅलीबरचे दोन मॅगझीन व 28 काडतुसे असलेले पिस्तुल मिळून आली. त्याच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्याने याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. तो विमानाने हैद्राबाद येथे जात असताना ही कारवाई करण्यात आली. त्याने ही पिस्तुले स्वतः जवळ का बाळगली ते बाळगण्या मागचा नेमका त्याचा उद्देश काय होता याचा पुढील तपास पोलिस करत आहेत.दीपक काटे पुण्याच्या इंदापूर तालुक्याचा रहिवासी आहे. तो भाजपच्या युवा मोर्चाचा प्रदेश सचिव आहे. याशिवाय तो शिवधर्म फाऊंडेशनचा संस्थापकदेखील आहे. त्याच्या सोशल मीडियावर भाजपच्या अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो आहेत. त्यात प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतही त्याचा फोटो आहे. हा फोटो पाटील भाजपमध्ये असतानाचा आहे.