पुणे-मराठी पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ गाव पोंभुर्ले येथे स्मारक व्हावे; यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली.
पत्रकार दिनानिमित्त आज पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुजीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव, उपाध्यक्ष चंद्रकांत फुंदे, अश्विनी पाटील केदारी, मिकी घई यांच्या सह पत्रकार संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आजच्या आधुनिक युगात एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी यातील बारकावे जाणून घेणं अतिशय महत्वाचे झाले आहे. त्यामुळे पत्रकार संघाने नवोदित आणि ज्येष्ठ पत्रकारांसाठी एखादे प्रशिक्षण शिबीर राबविण्याचे ठरविले. तर त्यासाठी सर्वतोपरी मदत करु, अशी ग्वाही यावेळी दिली.
ते पुढे म्हणाले की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ गाव पोंभुर्ले येथील आचार्यांच्या स्मारकाचा प्राधान्याने विकास व्हावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून रोगनिदान चाचण्यांमध्ये (महापालिका रूग्णालय केंद्रात – कमला नेहरू व सुतार दवाखाना) सर्व रोगनिदान चाचण्यांवर ५० टक्के सवलतीत चाचणी ही सुविधा क्रन्सा डायग्नोस्टिक्स लिमिटेडतर्फे आज पत्रकार दिनाच्या औचित्याने जाहीर करण्यात आली. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत क्रन्सा डायग्नोस्टिक्सचे सह व्यवस्थापकीय संचालक यश मुथा यांनी या विषयीचे पत्र पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनित भावे व सरचिटणीस मीनाक्षी गुरव यांना सुपूर्द केले.