या नववर्षी, कलीनरी रोमांच अनुभवण्यास सज्ज व्हा, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन एक जबरदस्त कुकिंग स्पर्धा घेऊन येत आहे. ‘मास्टर शेफ इंडिया’मध्ये यावेळी सेलिब्रिटीजची वर्णी लागणार आहे. यंदाच्या “सेलिब्रिटी मास्टरशेफ – अब उन सबकी सीटी बजेगी!”मध्ये अनेक प्रतिभावान किचनमध्ये आमनेसामने येताना दिसतील!
या मान्यवरांमध्ये आता गायक अभिजीत सावंत, कॉमेडीयन चंदन प्रभाकर आणि कंटेंट क्रिएटर फैजू सामील होत आहेत. आपले पाक कौशल्य दाखवून ही स्पर्धा जिंकण्यासाठी ते कंबर कसतील. पाककलेच्या माध्यमातून अभिजीतला पुन्हा प्रसिद्धी मिळवण्याची आशा आहे, तर चंदनला हे सिद्ध करायचे आहे की, तो फक्त एक कॉमेडीयन नाही. फैजूला डिजिटल विश्वाच्या बाहेर येऊन लोकांचे मन जिंकायचे आहे. हे सगळे जण खूप वेगवेगळ्या क्षेत्रातून आणि पार्श्वभूमीतून आले आहेत, त्यामुळे, त्या सगळ्यांचे मिश्रण खुमासदार होईल यात शंका नाही!
सुमधुर आवाज आणि सावध पावले उचलणारा अभिजीत सावंत बिग बॉस मराठीमधून दमदार पुनरागमन करून प्रकाश झोतात आला आहे. त्याने आपली कारकीर्द सावरली आहे आणि आता त्याला या नवीन ट्रॉफीची भूक लागली आहे. या शोविषयी आपले विचार व्यक्त करताना तो म्हणतो, “2004 मध्ये इंडियन आयडॉलचा पहिलावहिला सीझन जिंकणे हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. मी रातोरात देशभरात स्टार झालो. आता मी पिता झालो आहे, त्यामुळे माझ्या मुलांना ती जादू पुन्हा बघायला मिळावी अशी माझी इच्छा आहे. संगीत रियालिटी शोजचे विश्व पादाक्रांत केल्यानंतर आणि इतर फॉरमॅटमध्ये ठसा उमटवल्यानंतर सेलिब्रिटी मास्टरशेफचा अनुभव घेण्यास मी उत्सुक आहे. हा केवळ कुकिंगचा प्रवास नाही, तर कठोर परिश्रम, चिकाटी आणि आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करण्याचे महत्त्व मला माझ्या मुलांना पटवून द्यायचे आहे. मला आशा आहे की, त्यांना माझा अभिमान वाटेल आणि मला नव्या पिढीचे नवीन चाहते मिळतील!”
मनोरंजन क्षेत्रात बऱ्याच काळापासून काम करणारा चंदन प्रभाकर कसलेला कॉमेडीयन आहे, जो आता एक नवीन आव्हान पेलण्यास सरसावला आहे. या कुकिंग शोमध्ये दाखल होऊन आपल्यातील कॉमेडी शिवायचे इतर गुण दाखवण्याची संधी चंदनला मिळाली आहे. आपला उत्साह शेअर करत तो म्हणाला, “अगदी खालून सुरुवात करून मी आजवर बराच मोठा पल्ला गाठला आहे. मास्टरशेफ किचनमध्ये हे नवीन आव्हान पेलण्यासाठी मी सज्ज आहे. कुकिंग आणि कॉमेडी ही दोन अगदी भिन्न विश्व वाटली, तरी, माझ्यासाठी दोन्हीमध्ये सर्जनशीलता, जोखीम पत्करण्याची धडाडी आणि लोकांना आनंदी करण्याचा प्रयत्न आहे.”
दुसरीकडे, फैजूने आकर्षक रील्स बनवून सोशल मीडिया गाजवला आहे. आता फोनच्या ऐवजी फ्राइंग पॅन जवळ करण्याचे त्याने ठरवले आहे. विविध शोजमध्ये आपली किरकोळ उपस्थिती नोंदवल्यानंतर आता फैजू कुकिंग रियालिटी शो च्या माध्यमातून प्रकाशझोतात येत आहे. आपण केवळ पडद्यावरील एक चेहरा नाही हे सिद्ध करण्यास तो सज्ज आहे. फैजू म्हणतो, “एक कंटेंट क्रिएटर म्हणून अनेक वर्षे कंटेंटच्या माध्यमातून मी माझ्या चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आता कॅमेऱ्याऐवजी शेफचा कोट घालून काही तरी नवीन, गरमागरम, स्वादिष्ट असे सादर करण्यासाठी मी उत्सुक आहे. माझे पाककौशल्य दाखवण्यासाठी आणि स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढण्यासाठी सेलिब्रिटी मास्टरशेफ ही एक उत्तम संधी आहे.”
यापैकी कोणता स्टार होस्ट फराह खान आणि सेलिब्रिटी शेफ परीक्षक विकास खन्ना आणि रणवीर ब्रार यांना प्रभावित करेल?