प्रकरणाची मीडिया ट्रायल सुरू असण्यावर आक्षेप
मुंबई-बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी आपल्यावरील विरोधकांचे आरोप फेक नरेटीव्ह असल्याचा दावा केला. तसेच अजित पवारांशी मस्साजोग प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचाही दावा केला. त्यांच्या या दाव्यामुळे संतोष देशमुख हत्याकांडाचा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणी संशयाची सूई धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांच्याकडे जात आहे. पर्यायाने बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांसह अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी सोमवारी अजित पवारांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांत जवळपास तासभर चर्चा झाली. पण त्याचा तपशील बाहेर आला नाही. पण सूत्रांनी या दोन्ही नेत्यांतील चर्चेचा केंद्रबिंदू देशमुख यांची हत्या व विरोधकांनी केलेली राजीनाम्याची मागणी हा असल्याचा दावा केला आहे.
दुसरीकडे, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संक्षिप्त संवाद साधला. ते म्हणाले, मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवारांची भेट घेतली. मी त्यांना माझ्याची खात्याची माहिती दिली. आमच्यात माझ्या राजीनाम्यावर कोणतीही चर्चा झाली नाही हे मी ईमानदारीने सांगतो. कुणी काय आरोप करावे हे लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहेत. मी कुणाकुणाचे तोंड धरणार? त्यामुळे जे कुणी माझ्यावर आरोप करत आहेत, त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना तुम्ही हा प्रश्न विचारावा. विशेषतः ते महायुतीचे आमदार असतील तर त्यांनीही आपले पक्षप्रमुख व मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजे.
हिवाळी अधिवेशनात काही आमदारांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. ती मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली आहे. या प्रकरणात माझ्यावर संशय आहे. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणे योग्य नाही. या प्रकरणाचा अतिशय व्यवस्थित तपास सुरू आहे. हा तपास पूर्ण झाल्यानंतर मी बोलेन. माझ्यावर होणारे आरोप फेक नरेटिव्ह आहेत. यासंबंधी ट्रायल कोर्टात झाली पाहिजे. तपास यंत्रणांचा तपास सुरू आहे. या प्रकरणी मीडिया ट्रायल करणे सुरू चुकीचे आहे असे माझे मत आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.