बीड–
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे व खंडणी प्रकरणात अटक झालेल्या वाल्मीक कराड यांचे अनेक ठिकाणी संयुक्त भूखंड असल्याचा दावा भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणात आका हे वाल्मीक कराड आहेत, तर आकाचे आका हे धनंजय मुंडे आहेत. य दोघांच्या अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत. या लोकांनी आपल्या ड्रायव्हरच्या नावाने पुण्यात मगरपट्टी सिटीत एक अख्खा मजलाच बूक केला आहे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे बीडचे राजकारण अधिकच तापले आहे
सुरेश धस सोमवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, सरपंच हत्या प्रकरणातील आका हे वाल्मीक कराड आहेत, तर आकाचे आका हे धनंजय मुंडे आहेत. या दोघांची अनेक ठिकाणी संयुक्त मालमत्ता आहे. कुठेही विचारा, लोक सांगतील वाल्मीक कराडची 45 एकर जमीन आहे. अमूक ठिकाणी 50 एकर, बार्शी तालुक्यात 45 एकर, सोनपेठ तालुक्यात 45 एकर, दुसरीकडे 50 एकर, शिरसी तालुका माजलगाव येथे 45 ते 50 एकर. आमच्याकडे मांजरसुंबा नामक एक गाव आहे. तिथे 45 एकर जमिनी त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावाने आहे.
पुण्यातील मगरपट्टी सिटी येथे एक नवीन इमारत आहे. तिथे या लोकांनी आपल्या ड्रायव्हरच्या नावाने अख्खा मजलाच बूक केला आहे. हे पैसे कुणाचे आहेत? हे पैसे धनंजय मुंडे यांचे नव्हेत तर कुणाचे आहेत? आमच्याकडे प्रॉपर्टीच्या प्रकरणात जैन मल्टिस्टेटची चौकशी सुरू आहे. त्यात बहुतांश प्रॉपर्टीत धनंजय मुंडे यांच्या पत्नी व वाल्मीक कराड यांची नावे आहेत. मी या प्रकरणी एसीबी चौकशीची मागणी करणार आहे
सुरेश धस पुढे म्हणाले, वाल्मीक कराड एक-दोन नव्हे तर तब्बल 17 मोबाईल वापरतात. त्यांचे 100 बँक अकाउंट सापडले आहेत. त्या अकाउंटमध्ये 1000 कोटींहून अधिक जमा मुद्दल असण्याची शक्यता आहे. अदानी किंवा अंबानीसुद्धा 17 मोबाईल वापरत नसतील. मी अंबानी विचारणार आहे की, तुम्ही किती मोबाईल वापरता? किंवा नीता अंबानी यांनाही मी हाच प्रश्न करेन. एवढे जास्त मोबाईल कशासाठी लागतात? हे सर्व संशयास्पद आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने झाली ती अतिशय चुकीची आहे. आपल्या मराठी भाषेच्या शब्दकोशात जितक्या वाईटात वाईट शब्द असेल त्या पद्धतीने ही हत्या झाली. वाल्मीक कराड व धनंजय मुंडे हे दोघे आका व आकाचे आका आहेत. हे दोघेही एकमेकांत एवढे गुंतले आहेत की, त्यांना वेगळे करताच येत नाही. 14 व 29 जून रोजी कुठे बैठक झाली? संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात जून महिन्यात झाली. त्याच्या प्रमुख बैठकीला धनंजय मुंडे होते. धनंजय मुंडे यांचा सातपुडा हा शासकीय बंगला आहे. मी काल स्टेटमेंट केले की, ही बैठक या शासकीय बंगल्यात झाली. वाल्मीक कराडने उभे केलेले हे साम्राज्य मागील 5 वर्षांतील आहे.

