पुणे-कारागृहात बंदिस्त असलेल्या सराईत गुन्हेगार आरोपीस जामीन देण्यासाठी लष्कर न्यायालायात बनावट कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वानवडी पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बनावट आधारकार्ड, शिधापत्रिका ही बोगस कागदपत्रे जप्त केली आहे.
याप्रकरणी संतोष शंकरराव तेलंग (वय ३२, रा. शेवाळवाडी , हडपसर,पुणे) याच्यासह सात आरोपीांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सोमनाथ कांबळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर न्यायालयाचे स्थलांतर वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगार बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोड याला कोंढवा पोलिसांनी गंभीर चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. भोंडविरुद्ध चार गु्न्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यात भोंडला जामीन मिळवून देण्यासाठी लष्कर न्यायालयातील एका वकिलामार्फत तेलंग आणि साथीदारांनी बनावट कागदपत्रे सादर केली. कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी बनावट आधारकार्ड, शिक्षापत्रिका सापडल्या. चौकशीत बनावट कागदपत्रे सादर करुन जामीन मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस आला.तेलंग याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत बनावट कागदपत्रे देखील मिळून आले आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस टोणे पुढील तपास करत आहेत.