महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचे गौरवोद्गार
पुणे, दि. ०६ जानेवारी २०२५: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया रचला व शिक्षणाद्वारे महिलांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झाली. एकेकाळी पुरुषांचे क्षेत्र समजल्या जाणाऱ्या वीजक्षेत्रात देखील स्वकर्तृत्वाने भरारी घेणाऱ्या महिला शक्तीचे अस्तित्व खऱ्या अर्थाने प्रकाशमान झाले आहे, असे गौरवोद्गार मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी काढले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या पुणे परिमंडलातील महिला अभियंत्यांसाठी रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले की, वीजक्षेत्र अत्यंत धकाधकीचे असले तरी महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रभावीपणे व आत्मविश्वासाने महावितरणच्या प्रगतीला हातभार लावला आहे. महावितरणने तंत्रज्ञ व विद्युत सहायक म्हणून महिलांना देशात सर्वप्रथम संधी दिली आहे. वीज यंत्रणेतील तांत्रिक कामे, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण, नवीन वीजजोडण्या आदी तांत्रिक कामे महिला अभियंता व कर्मचारी समर्थपणे करीत आहे. ही आत्मनिर्भरता देखील अभिमानास्पद आहे.
या कार्यशाळेत सहायक महाव्यवस्थापक (वित्त) सौ. माधुरी राऊत, कार्यकारी अभियंता श्री. धनराज बिक्कड, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी विविध योजना व कामांच्या इम्प्रुव्हमेंट ऑफ पॅरॉमीटर्ससह पीएम सूर्यघर वीज योजना, वीजहानी कमी करणे तसेच महसूलवाढ व वसूली आदींबाबत माहिती दिली. या कार्यशाळेला उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भुपेंद्र वाघमारे यांची तसेच ३० महिला अभियंत्यांची उपस्थिती होती.