पुणे, दि. ६: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी कळविले आहे.
परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर क्रमांक १ व २ च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास परीक्षा परिषदेकडे १६ डिसेंबर २०२४ पर्यंत पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन ही अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन, आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या अंतिम उत्तरसूचीनुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (एमएएचएटीईटी) परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही श्री. राठोड यांनी कळविले आहे.