पोलिसांनी दोन्ही गाड्या घेतल्या ताब्यात
मुंबई-येथील जगप्रसिद्ध ताज हॉटेलच्या परिसरात एकाच नंबरच्या दोन कार आढळल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हॉटेलमध्ये चेक इन केले जात असताना हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. पोलिसांनी या दोन्ही गाड्या ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ताज हॉटेल व त्या भोवतीचा परिसर अत्यंत संवेदनशील समजला जातो. 2008 मध्ये अजमल कसाब व त्याच्या सहकाऱ्यांनी या हॉटेलवर हल्ला केला होता. तेव्हापासून याठिकाणी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येते. या पार्श्वभूमीवर उपरोक्त घटना घडली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, ताज हॉटेलच्या परिसरात पांढऱ्या रंगाच्या 2 कार आढळल्या. चेक इनच्या वेळी या दोन्ही कारवर MH 01 EE 2388 असा एकच नंबर असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे या दोन्ही कार एकाच मॉडेलच्या होत्या. यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले होते. त्यामुळे ताजच्या सुरक्षा यंत्रणेने तत्काळ त्याची खबर कुलाबा पोलिसांना दिला.त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्यात. पांढऱ्या रंगाच्या या कारवर पिवळ्या रंगाची नंबरप्लेट होती. त्यामुळे या कार्सचा वापर प्रवाशी वाहतुकीसाठी केला जात असावा असा संशय आहे.
विशेष म्हणजे ताज हॉटेलमध्ये एक समिटीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वीच या कार आढळल्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे.
पोलिस सध्या दोन्ही कारसाठी एकाच नंबरचा वापर का करण्यात आला? यामागे काही काळेबेरे होते का? आदी बाबींचा तपास करत आहेत. यासाठी दोन्ही गाड्यांच्या चालकांची कसून चौकशी केल जात आहे. पण तूर्त तरी या प्रकरणात घातपात किंवा दहशतवादाचा कोणताही धागा सापडला नाही.
या प्रकरणी असेही सांगितले जात आहे की, एका कार चालकाने दंडापासून वाचण्यासाठी गाडीची नंबर प्लेट बदलली. पण दुर्दैवाने ती गाडी व खरी गाडी एकाचवेळी ताज हॉटेलमध्ये पोहोचली. यामुळे हा प्रकार उजेडात आला. खऱ्या नंबरच्या गाडी मालकाने स्वतःहून बोगस नंबरप्लेटवाल्या गाडीची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस तिथे पोहोचले. पण याची पुष्टी अद्याप झाली नाही