प्रा. मिलिंद जोशी यांनी साधला संवाद : पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात मुलाखतीचे आयोजन
पुणे : वरवर मिष्किल वाटणाऱ्या पण समाजातील गांभीर्य मांडणाऱ्या खुमासदार नायगावकरी कवितांचे सादरीकरण, त्यावरील त्यांचेच हटके भाष्य आणि त्यातून श्रोत्यांमध्ये पुन्हा-पुन्हा पिकणारी खसखस अशा वातावरणात ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्याशी रंगलेल्या गप्पांच्या मैफलीला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
किस्स्यामागून किस्से, शाब्दीक कोट्या, वर्तमानातील परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणाऱ्या कवी अशोक नायगावकर यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक, वक्ते मिलिंद जोशी यांनी संवाद साधला. निमित्त होते पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात आयोजित कवी अशोक नायगावकर यांच्या प्रकट मुलाखतीचे.
मराठी भाषेची थोरवी-गोडी सांगताना जगात फक्त मराठी भाषेतच ‘चोराच्याही मनात चांदणे असते’, असे नायगावकर यांनी म्हटल्यावर मराठी भाषेच्या सौंदर्याची श्रोत्यांना पुन्हा एकदा ओळख पटली. मराठी भाषेच्या सद्यस्थितीवरही खास टिप्पणी करताना भाषेतील वाक्प्रचारांमधील खाचाखोचा आजच्या पिढीला कळत नसल्याने त्यातील गंमत नाहीशी झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन मांडणाऱ्या कवितांच्या साथीने राजकीय, समाजवास्तव, कौटुंबिक नातेसंबंध, भोवताली भेटणारी माणसे, त्यांचे स्वभाव, वर्तणूक यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून टिपलेली वैशिष्ट्ये नायगावकर यांच्या कवितांमधून रसिकांना अनुभवास आली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुमारे दोन तास हास्याचे फवारे उसळत राहिले. लोकप्रिय हास्यकवी नायगावकर यांनी आपल्या मिष्किल शैलीने एक उर्जाप्रवाह सभागृहात खळखळत ठेवला.
‘मी वाईचा, कृष्णाकाठचे संस्कार घेऊन वाढलो. कृष्णेच्या घाटांवर होणारे उत्सव, वसंत व्याख्यानमाला, विश्वकोश मंडळाचे सान्निध्य, तिथे येणारी विद्वान मंडळी, बंधूंची विश्वकोश ग्रंथालयातील नोकरी, त्यामुळे लागलेले वाचनाचे वेड आणि हाती आलेला पुस्तकांचा खजिना, यातून संस्कार घडले’, असे नायगावकर यांनी सांगितले. ‘पराकोटीचा साधेपणा, हे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे वैशिष्ट्य आहे, याचा अनुभव लहानपणापासून घेतला. पुढे मुंबईत आल्यावर अनेक मान्यवरांचा सहवास मिळाला. नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, शंकर वैद्य यांच्यासह अनेक नवे मित्र मिळाले. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांच्यामुळे रंगमंचीय कविता सादरीकरणाचे संस्कार मिळाले. 31 वर्षे बँकेत कार्यरत होतो. मुंबईत आल्यावर सुरवातीला आईसोबत पापड विकण्याचे काम केले’, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
‘टिळक’, ‘बाराखडी’, ‘संपत’ अशा गाजलेल्या कविता सादर करत नायगावकर यांनी राजकीय वास्तव, सामाजिक प्रदूषण, मराठी भाषेविषयीची अनास्था, कौटुंबिक स्तरावर झालेले विपरित परिणाम, बदललेल्या मानसिकता अशा अनेक मुद्द्यांवर उपरोधिक, तिरकस भाष्यही केले. प्रत्येक मराठी कुटुंबातील तिसऱ्या पिढीत मराठी भाषा वाचणारा, लिहिणारा, बोलणारा प्रतिनिधी आहे का, हा त्यांचा प्रश्न भाषेचे भवितव्य गडद करणारा होता. भाषा लोप पावते आहे, अचूकता हे मराठी भाषेचे शक्तिस्थान मागे पडते आहे, याची जाणीव करून देत असतानाच, नायगावकर यांनी रसिकांना खुमासदार व मार्मिक भाष्य करून हास्यरसात भिजवत ठेवले त्याचवेळी अंतर्मुखही केले.
प्रा. मिलिंद जोशी यांचे संवाद कौशल्य, त्यातून नायगावकर यांना सुचलेल्या आठवणी, कविता, शाब्दिक कोट्या, खुमासदार किस्से, विनोद अशा मिश्रणाने मुलाखतीत रंग भरले.
यावेळी अशोक पगारिया, डॉ. सुनीता धर्मराव, प्रतिमा दुरुगकर, सुनीता ओगले, दिलीप कुंभोजकर आणि अनिल दामले या रोटेरियन लेखकांचा सत्कार करण्यात आला. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.
कविता, किश्श्यांनी रंगली नायगावकरी मैफल
Date:

