आर्टफॅन्स’ या हौशी चित्रकारांच्या समूहातर्फे आयोजन ; कला क्षेत्रातील विविध शैली व कल्पकतेने भरलेले प्रदर्शन
पुणे : ‘आर्टफॅन्स’ या हौशी चित्रकारांच्या समूहाचे ‘रंगोत्सव’ हे प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीत दि.७ ते १२ जानेवारी दरम्यान भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मोनिका मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते दि.७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.
प्रदर्शनात १४ कलाकारांच्या ७० कलाकृती सादर केल्या जातील. या कलाकृतींमध्ये निसर्गचित्रे, म्युरल्स, आणि स्टिल लाईफसारख्या विविध शैलींचा समावेश असून, त्या ऑइल, ऍक्रेलिक, तसेच पेन्सिल शेडिंगसारख्या माध्यमांमध्ये साकारण्यात आल्या आहेत.
मागील आठ वर्षे चित्रकलेत नवनवे प्रयोग करणाऱ्या या चित्रकारांमध्ये २२ वर्षांच्या तरुणांपासून ७५ वर्षांच्या अनुभवी चित्रकारांचा समावेश आहे. कला क्षेत्रातील विविध शैली व कल्पकतेने भरलेले हे प्रदर्शन असणार आहे.
वैदेही दाबक, नितीन महानव, शैला कारखानीस, उल्हास भानू, आल्हाद नाईक, मृदुला धोंगडे, हेमांगी गोरे, जयश्री बेडेकर, स्वाती कुट्टे, संगीता ताकवले, कविता ठाकरे, नेहा पाटील, माधवी दिवेकर, आणि श्रीकला राव यांचा प्रदर्शनात सहभाग आहे. दि. १२ जानेवारी पर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ यावेळेत हे प्रदर्शन रसिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
चित्रकलेवरील प्रेमाने एकत्र आलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील आणि क्षेत्रातील कलाकारांनी ‘आर्टफॅन्स’ हा समूह स्थापन केला. सुरुवातीला एकत्र येऊन चित्रे पाहणे, त्यावर चर्चा करणे, आणि आपल्यालाही अशा प्रकारे चित्र काढता येईल का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना या कलाकारांचा प्रवास सुरू झाला.
सन २०१८ मध्ये मुंबईतील नेहरू आर्ट गॅलरीत समूहाला स्वतःचे पहिले प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. या प्रदर्शनाच्या यशात उल्हास भानू यांचे मोलाचे योगदान होते. त्यानंतर पुण्यातील पी.एन. गाडगीळ औंध, ग्लिंप्स, बालगंधर्व कलादालन यांसारख्या ठिकाणीही ‘आर्टफॅन्स’ ने आपली कला सादर केली. मात्र, ही प्रदर्शने इतर कलाकारांच्या समूहासोबत होती. तेव्हापासून आर्टफॅन्स ला पुण्यात आपले स्वतंत्र प्रदर्शन सादर करण्याची इच्छा होती.
समूहातील सदस्य सतत नवीन माध्यमे शिकण्याचा प्रयत्न करत राहिले. २०२३ मध्ये त्यांनी नितीन महानव यांच्याकडून ऍक्रेलिक कलेचे धडे घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आर्टफॅन्स च्या कलाकारांनी आपले प्रदर्शन अधिक आकर्षक बनवले आहे.


