पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात शि. द. फडणीस यांचा रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने सन्मान
पुणे : ‘मराठी’चे होणार काय असा प्रश्न विचारला जात असतानाच रोटरी आयोजित मराठी साहित्य संमेलनामुळे अनेक लेखक, प्रकाशक समाजासमोर येतील, पुस्तके वाचली जातील, मराठी भाषाही टिकेल असा विश्वास व्यक्त करून असे साहित्यविषयक उपक्रम सातत्याने होत रहावेत, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केले. व्यंगचित्र, हास्यचित्रे काढणे हा माझा छंद होता. या छंदामुळे रसिकांनी मला हशा आणि टाळ्यांची बिदागी दिली, असेही कृतज्ञतापूर्वक उद्गार फडणीस यांनी काढले.
व्यावसायिक सेवा देताना सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीस मानाचे रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड देऊन गौरविले जाते. पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 5) फडणीस यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना फडणीस बोलत होते. पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, प्रांतपाल शितल शहा, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष सूर्यकांत वझे, रोटरी व्होकेशनल डायरेक्टर मधुमिता बर्वे, डीजीई संतोष मराठे मंचावर होते. उपरणे, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि वेलदोड्याचा हार असे पुरस्काराचे स्वरूप होते.
व्यावसायिक गुणवत्ता परीक्षा मी 40 वर्षांपूर्वीच दिली आणि या व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डच्या निमित्ताने त्याचे प्रमाणपत्र मला आज मिळत आहे, अशा भावना व्यक्त करून फडणीस पुढे म्हणाले, व्यंगचित्र, हास्यचित्र काढणे हा माझा छंद होता. हा छंदच पुढे माझे करिअर बनला. रसिकांनी भरभरून दिलेल्या प्रेमामुळे माझ्याकडे हशा, टाळ्या आणि प्रेमाचीच गणती जास्त होती. परंतु याचा मला कधीही खेद वाटला नाही. शंभरीत पदार्पण केलेल्या शि. द. फडणीस यांनी उभे राहून केलेल्या भाषणाला रोटेरियन्सनी टाळ्याच्या गजरात दाद दिली.
अशोक नायगावकर म्हणाले, रोटेरियन्सचे काम साहित्य क्षेत्राकडे वळते आहे हे मराठी भाषेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. शि. द. फडणीस यांच्या सारख्या महान कलाकाराच्या कार्यकर्तृत्वाची दखल जागतिक स्तरावर घेतली जावी. त्यांचा माझ्या हस्ते झालेला सन्मान हा मी माझाच सन्मान समजतो.
विश्वास पाटील म्हणाले, शि. द. फडणीस हे व्यंगचित्र, हास्यचित्र या कलाप्रकारात ‘या सम हा’ अशा अत्युच्य पदावर आहेत. सत्तर वर्षांहून अधिक काळ मोहिनी मासिकामध्ये चित्रे रेखाटून मोहिनीला शिदंनी चिरतरूण ठेवले आहे.
रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने शि. द. फडणीस यांना सन्मानित केल्याने कार्यक्रमाची उंची वाढली आहे, असे मत शितल शहा यांनी व्यक्त केले. रोटरी साहित्य संमेलन मोठ्या प्रमाणात आयोजित केल्याचा अभिमान आहे, असे सांगून संतोष मराठे म्हणाले, हा स्तुत्य उपक्रम सातत्याने सुरू रहावा.
पीएनजीचे प्रतिनिधी मिहिर केमकर यांचा सन्मान शितल शहा यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पदन्यास कथक डान्स अकॅडमीच्या रेणुका केळकर-टिकारे आणि सहकाऱ्यांनी शिववंदनेद्वारे केली. मानपत्राचे लिखाण सुप्रिया जोगदेव यांनी केले होते तर वाचन प्रज्ञा डांगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.