सूर संगत संस्थेच्या वतीने आयोजित सांगीतिक मैफल
पुणे : सूर संगत संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांगीतिक मैफिलीने श्रोत्यांना शास्त्रीय संगीताचा एक अद्वितीय अनुभव दिला. विविध रागांचे सादरीकरण आणि वाद्य संगीताच्या सुंदर साथीने रसिक मंत्रमुग्ध झाले. बागेश्री अंगाचा चंद्रकंस आणि शहाणा कानडा या रागांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळा आयाम दिला.
सूर संगत संस्थेच्या वतीने धायरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमेय बिच्चू, केदार केळकर यांनी सादरीकरण केले.
मैफिलीची सुरुवात अमेय बिच्चू यांच्या एकल संवादिनी वादनाने झाली. त्यांनी तिलक कामोद, श्याम कल्याण, आणि नंद या तीन रागांच्या मिश्रणातून साकारलेल्या रागाने रसिकांची मने जिंकली. अमेय बिच्चू हे तन्मय देवचके, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, आणि विदुषी पद्मा तळवलकर यांचे शिष्य आहेत.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात केदार केळकर यांनी शास्त्रीय गायनाचे सादरीकरण केले. बागेश्री अंगाचा चंद्रकंस आणि शहाणा कानडा या रागांनी केदार यांनी मैफिलीला उंची दिली. पंडित सुहास व्यास यांचे शिष्य असलेल्या केदार यांना संवादिनीवर अमेय बिच्चू यांनी साथ केली.
या मैफिलीला तबल्याची साथ तन्मय बिच्चू यांनी केली. मनोहर पिंपळस्कर, पंडित रामदास पळसुले, पंडित स्वपन चौधरी, आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे शिष्य असलेल्या तन्मय यांनी वाद्य संगीताची आणि गायन साथ या दोन्हींचा सुंदर मेळ साधला.