पुणे : ‘ती भेटते मला वेगवेगळ्या रुपात’, ‘असा एकटेपणा हवासा’, ‘आनंद लेणं’, ‘मनातला काळोख’, ‘निर्जिवास फुटते वाचा’, ‘खरंच का हो माणूस झाला स्वस्त’ अशा एकापेक्षा एक भावस्पर्शी आणि मनाला भिडणाऱ्या कवितांद्वारे रोटेरियन कवींनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. रसिकांनी देखील टाळ्यांच्या गजरात त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.
निमित्त होते पहिले रोटरी मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे. यात पंधरा कवींनी आपले साहित्य विश्व काव्याच्या माध्यमातून उलगडले. ज्येष्ठ वात्रटीकाकार, साहित्यिक रामदास फुटाणे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी विविध रचनांवर भाष्य करीत वातावरण रंजक केले. संमेलनाचे सूत्रसंचालन कवयत्री डॉ. अंजली कुलकर्णी यांनी तर निनाद जोग यांनी संयोजन केले.
नीता केळकर यांनी ‘ती भेटते मला’ या रचनेतून आई, बहीण, मावशी, पत्नी, अशी विविध स्त्री रूपे उलगडली. जयश्री कुबेर यांनी मनातील सकारात्मक दृष्टिकोन ‘जिद्द’ या रचनेतून मांडला. स्नेहल भट यांनी ‘असा एकटेपणा हवासा’ ही वेगळ्या विषयावरची रचना सादर करून मनाचे वास्तव शब्दबद्ध केले. डॉ अश्विनी गणपुले यांनी मनाच्या नकारात्मक भावनांचा वेध घेणारी ‘मनातला काळोख’ ही कविता, तर प्रदीप खेडकर यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम्’, तसेच राहुल लाळे यांनी ‘मन वाटा’, मुरलीधर रेमणे यांनी ‘वारी’ या काव्यरचना सादर केल्या. अंदमान येथील सेल्यूलर जेलमधील ज्या खोलीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवण्यात आले होते त्या खोलीचे मनोगत मांडताना सुप्रिया जोगदेव यांनी ‘निर्जिवास फुटता वाचा’ ही हृदयस्पर्शी कविता सादर केली.
याखेरीज अंकाजी पाटील यांनी ‘खरचं माणूस स्वस्त झाला आहे का’ ही वास्तववादी कविता तर भारद्वाज पक्ष्यावर तनुजा खेर तसेच हर्षदा बावनकर यांनी ‘आनंद लेणं’ ही कविता सादर केली. डॉ आनंद कंक यांनी ‘ईश उवाच’ तर ममता कोल्हटकर यांनी श्रीकृष्णावरील काव्यरचना सादर केल्या. विजय पुराणिक आणि शशिकांत शिंदे यांनीही कविता सादर केल्या. डॉ. अंजली कुलकर्णी यांनी ‘बदलत गेलेली सही’ ही काव्यरचना सादर करून रसिकांची मने जिंकली.
रोटरी आयोजित मराठी साहित्य संमेलनाच्या उपक्रमाचे कौतुक करून फुटाणे म्हणाले, रोटरीच्या या अभिनव उपक्रमातून मराठी भाषेचा जागर होत आहे. अभिजात मराठी भाषा टिकविण्याचा हा प्रयत्न स्वागतार्ह आहे. कविसंमेलन हे रसिकांमुळे रंगत असते हे येथील रसिकांच्या उपस्थितीवरून लक्षात येत आहे. असे फुटाणे म्हणाले. यावेळी त्यांनी कविंनी सादर केलेल्या काव्यरचनांवर काव्यात्मक पद्धतीने भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले.
योगेश सोमण लिखित ‘ट्रेनिंग’ हे प्रहसन अविनाश ओगळे, लीना गोगटे यांनी तर रोटेरियन संजय डोळे लिखित ‘मन:शांती’ हे प्रहसन राजेंद्र उत्तुरकर आणि सुनिता ओगले यांनी प्रभावीपणे सादर केले. पहिल्या दिवसाची सांगता भरत नाट्य मंदिर निर्मित संगीत कट्यार काळजात घुसली या नाट्यप्रयोगाने करण्यात आली. यात अभय जबडे, रवींद्र खरे, अर्णव पुजारी, वज्रांग आफळे, विश्वास पांगारकर, निधी घारे, अनुष्का आपटे, ऋषिकेश बडवे आणि डॉ. चारुदत्त आफळे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून दाद दिली.
भावस्पर्शी कवितांमधून व्यक्त झाले रोटेरियन कवी
Date:

