माझं पुणं खड्ड्यात जाऊ देणार नाही -संदीप खर्डेकर
पुणे:आज गोपाळकृष्ण गोखले रस्त्याने (फर्गयुसन रस्त्याने) मोकळा श्वास घेतला असून पुणे मनपा प्रशासनाने धडक मोहीम आखून आज पदपथ, पार्किंग स्पेस तसेच साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन अशी सर्वत्र कारवाई केली. ही कारवाई सामान्य पुणेकरांनी सातत्याने उभारलेल्या लढ्याला मिळालेले यश असून याबद्दल प्रशासनाचे ही खुल्या मनाने अभिनंदन. करतो असे संदीप खर्डेकर म्हणाले. गेल्या सोमवारी मी मा. आयुक्तांना याबाबत सप्रमाण पत्र लिहिले होते व आज त्यांनी कारवाई केली हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही खर्डेकर म्हणाले. मात्र ह्या मागणीनंतर कल्याणीनगर, म्हात्रे पूल ते राजाराम पूल डी पी रस्ता, सिंहगड रस्ता, लक्ष्मी रस्ता इ ठिकाणा वरून नागरिकांनी संपर्क केला असून अश्या सर्व ठिकाणी प्रशासनाने कोणाला ही न जुमानता कारवाई करावी अशी मागणी देखील संदीप खर्डेकर यांनी केली आहे.तसेच हे सगळे अनधिकृत पुन्हा उभारले जाणार नाही याची दक्षता ही प्रशासनाने घ्यावी असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
प्रशासनाने पथ विभागाच्या माध्यमातून एक जाहिरात प्रसिद्ध केली असून प्रत्येक प्रभागात रस्ते, पदपथ, चेंबर यांच्या तक्रारीसाठी एका उप अभियंता चा मोबाईल क्रमांक दिला आहे. याचे प्रभागश: फलक लावून जनजागृती करावी व आलेल्या तक्रारीचे त्वरित निराकरण करावे अशी विनंती देखील संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
माझं पुणे मी खड्ड्यात जाऊ देणार नाही, भाजपा चे सर्व मंत्री,खासदार, आमदार यांच्या माध्यमातून पुणे शहर हे पुन्हा देशातील सर्वोत्तम राहण्याजोगं शहर करण्यासाठी आपण सर्वस्व देऊ असेही खर्डेकर म्हणाले.
जोपर्यंत मनपा निवडणुका होतं नाहीत व सभागृह अस्तित्वात येत नाही तोवर प्रशासनावर दबाव आणून शहराच्या समस्या सोडविण्यासाठी 1990 व 2000 च्या दशकाप्रमाणे स्वयंसेवी संस्था आणि समविचारी राजकारण्यांना एकत्र घेऊन लढा उभारणार असल्याचेही ते म्हणाले .