पहिल्या रोटरी साहित्य संमेलनात विश्वास पाटील यांचा उलगडला साहित्य प्रवास
पुणे : कोल्हापूरमधील छोट्याशा खेड्यात माझे बालपण गेले. भाषा शिक्षकांमुळे वाचनाची गोडी लागली. वडिलांच्या सल्ल्यामुळे लेखानाच्या क्षेत्रात प्रगती केली. शासकीय नोकरीत व्यस्त दिनचर्या असूनही लिखाणाची आवड असल्याने नेटाने लेखन केले. अनेक अनुभवातून मनात कथाबिजे रुजली गेली. त्या कथांमधून कैवल्याचा आनंद मिळाला, अशा भावना पहिल्या रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केल्या.
रोटरी क्लबतर्फे आयोजित पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात विश्वास पाटील यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्याशी रोटेरियन वैशाली वेर्णेकर आणि रोटेरियन अभय जबडे यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर मधील छोट्याशा खेड्यात आपले बालपण गेले असल्याचे सांगून विश्वास पाटील म्हणाले, लेखनाला पूरक असे वातावरण गावात नव्हते; परंतु गावात निसर्गसौंदर्य मोठ्याप्रमाणात होते. गावाच्या एका बाजूला विशाळगड तर दुसऱ्या बाजूला पन्हाळगड होता. गुरे राखायला जाताना त्यांचे निरिक्षण करत असे. इतिहासाची आवड असल्याने गावातील लवलवत्या गवताच्या पात्यात मला शिवाजी महाराजांचे शूर सैनिक दिसत असत. शालेय वयातच वीर धवल कादंबरी वाचनात आली. यातून वाचनाची आवड निर्माण झाली. नववीत असताना एका वर्षात अडीचशेहून अधिक पुस्तके वाचली. शाळेतील मराठीचे शिक्षक उत्तम शिकवित असत; त्यामुळे अभ्यासाची गोडी वाढली. आई निरक्षर तर वडिल फक्त पाचवीपर्यंत शिकलेले होते; परंतु त्यांचा बाणा लढवय्या होता. त्यांच्या प्रेरणेनेच लघुकथा लिखाण सोडून कादंबरी लेखनाकडे वळलो.
खूप लहान वयातच भावलेल्या विषयांवर लिखाण सुरू केले. पुढे स्पर्धा परिक्षेत यश मिळाल्याने सरकारी अधिकारी झालो. अतिशय व्यस्त दिनचर्या असतानाही घरी गेल्यानंतर जास्तीत जास्त वेळ लेखनात घालवत असे. शनिवारी-रविवारच्या सुट्टीत जणू भूमिगत होऊन लिखाण करत असे. लिखाण करताना मी सरकारी अधिकारी असल्याचे दडपण न घेता विविध विषयांवर मोकळेपणाने लिखाण केले. त्यावेळी हात आखडता घेतला नाही. नाहीतर शब्द माझ्यावर प्रसन्नच झाले नसते, अशा भावनाही पाटील यांनी या वेळेला व्यक्त केल्या.
ऐतिहासिक लिखाण करण्यासाठी भरपूर वाचन केले, अभ्यास केला, घटनास्थळांना भेटी दिल्या. त्यामुळे मी केलेल्या ऐतिहासिक लिखाणात वास्तवता आली. तर काही प्रसंगांना प्रतिभेतून कल्पनेची जोड दिली.
सामाजिक लेखन करताना प्रत्यक्ष अनुभवांचा मोठा आधार लाभला. अधिकारी म्हणून कार्यरत असताना जनसंपर्क अफाट असल्याने अनेक अनुभव आले. त्यातूनच सामाजिक स्वरूपाचे लेखन झाले.
सरकारी नोकरीत असताना लेखक म्हणून सहकाऱ्यांनी कौतुक केले; परंतु अनेकदा मत्सरालाही सामोरे जावे लागले. परंतु वयाच्या अवघ्या 32व्या वष साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याने त्यांची तोंडे बंद झाली. अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. वाङ्मय चौर्य, जीवनातून उठविण्याचा प्रयत्नही झाला; परंतु त्यातूनही सहीसलामत बाहेर पडलो.
आजच्या वाचन संस्कृतीवर भाष्य करताना विश्वास पाटील म्हणाले, मराठी साहित्यावर अनेक आक्रमणे झाली; पण त्यातून मराठी भाषा तावून-सुलाखून बाहेर पडली आहे. आजचा जमाना रिल्सचा असला तरी सुजाण वाचक आत्म्याचा आवाज ऐकून पुन्हा एकदा साहित्य-संस्कृतीकडे वळतील असा आशावादही त्यांनी दर्शविला.