पुणे- मराठीत बोलणार नाही म्हणत मराठी कर्मचाऱ्यावर अरेरावी करणाऱ्या एअरटेल कंपनीच्या एका टीम लीडरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पद्धतीने चोप दिला आहे. या घटनेमुळे मुंब्रा येथे घडलेल्या घटनेची आठवण ताजी झाली आहे.मुंब्रा येथे एका मराठी तरुणावर मराठी बोलण्याचा आग्रह धरल्यामुळे माफी मागण्याची वेळ आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असताना पुण्यात एअरटेलच्या कार्यालयात असाच एक प्रकार घडला आहे. या प्रकरणात कंपनीच्या एका टीम लीडरने मराठी बोलणार नाही असे म्हणत मराठी कर्मचाऱ्यावर अन्याय केला होता. वाकडेवाडी परिसरातील एअरटेलच्या कार्यालयात हा प्रकार घडला होता. ही खबर मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कानावर गेली. त्यानंतर त्यांनी तत्काळ एअरटेलच्या कार्यालयात जाऊन सदर टीम लीडरला जाब विचारला. तसेच त्याला आपल्या पद्धतीने चोपही दिला.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, सदर टीम लीडर मराठी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत होता. फ्लोअरवर हिंदीचे बोलायचे, मराठी बोलल्यास कामावरून कमी करणे, सनावारांना सुट्टी नाकारण, 2-2 महिने पराग न देणे असे प्रकार हा व्यक्ती करत होता. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी मनसेकडे तक्रार केली होती. त्याची माहिती मिळताच शाहबाज अहमद नामक सदर व्यक्तीने पुन्हा त्यांना कामावरून कमी करण्याची धमकी दिली.
त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी एअरटेलच्या वाकडेवाडी परिसरातील कार्यालयात आपला मोर्चा वळवला. त्यांनी शाहबाज अहमदकडे या प्रकरणी जाब विचारला. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मनसेचे राज्य सचिव आशिष साबळे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. तसेच येत्या सोमवारपर्यंत मराठी कर्मचाऱ्यांचे पगार जाले नाही, तर एकाचवेळी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील कंपनीचे कार्यालय फोडले जाईल असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी यावेळी संबंधितांना दिला.
मुंब्रा प्रकरणात विशाल गवळी नामक एका मराठी तरुणाला मराठी बोलण्याचा आग्रह धरल्यामुळे माफी मागण्याची वेळ आली होती. विशाल गवळी हा मराठी तरुण बाजारात फळे आणण्यासाठी गेला होता. त्याने फळविक्रेत्याकडे मराठीत फळांचा भाव विचारला. त्यावर फळविक्रेत्याने संतापून मला मराठी येत नाही, तू हिंदीत बोल असे त्याला सांगितले. त्यावर विशाल गवळीने महाराष्ट्रात राहून तुला मराठी येत नाही का? प्रतिप्रश्न केला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसान भांडणात होत असताना तिथे मोठा जमाव जमला. त्यानंतर जमावाने त्याला कान पकडत हिंदीत माफी मागण्यास भाग पाडले.