पुणे : आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून त्यांना शिक्षण देत उंच आकाशात भरारी घेण्याची स्वप्न पाहणारी आई…आपल्या सारखे दिवस आपल्या लेकरांनी पाहू नये यासाठी दिवसरात्र काबाडकष्ट करणारी आई आपल्या मुलांसाठी देवतास्वरुप असते…अशा समाजातील कर्तृत्ववान मातांचा सन्मान सोहळा साजरा झाला. आईचा सन्मान करत मुलांनी आईला पेढा भरविण्याचा हृदयस्पर्शी क्षण उपस्थितांनी यावेळी डोळ्यात साठविला.
मातृगौरव न्यास, ज्ञानेश्वरी वाचन मंदीर, अखिल मंडई मंडळ, सेवा मित्र मंडळ आणि सहयोगी संस्थांच्या वतीने ११ कर्तृत्ववान मातांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याचे यंदा २५ वे वर्षे होते. अखिल मंडई मंडळाच्या समाज मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी लीला गांधी, भालचंद्र पुरंदरे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे हर्षद झोडगे, विनायक मोडक, दत्ता सागरे, पराग ठाकूर यावेळी उपस्थित होते. शेखर कोरडे, विश्वास भोर, अनील रुपनूर, सारंग सराफ यांनी संयोजनासाठी सहाय्य केले. स्मृतिचिन्ह, महावस्त्र, श्रीफळ, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरूप होते.
श्रीदेवी हवालदार, कुमुदिनी गुजराती, शुभलक्ष्मी डाखवे, सिंधू डेंग, पार्वतीबाई चव्हाण, सुभद्राबाई लांडे, शालिनी यादव, जयश्री परचुरे, सीता जावळकर, माधुरी मुकेरकर, रत्नप्रभा मुंगळे या मातांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सुचित्रा खुटवड, अंजली घुले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
भालचंद्र पुरंदरे म्हणाले, सर्व मातांच्या चरित्रांचे शब्दांकन करुन त्याचा ग्रंथ करायला हवा. पुढच्या पिढीला हे ग्रंथ मार्गदर्शनाचे काम करतील. तरुणांनी देखील यातून प्रेरणा घ्यायला हवी. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश पोटफोडे यांनी आभार मानले.