सहस्त्र शंकर गीता पारायण समितीच्या वतीने सोहळ्याचे आयोजन
पुणे: सद्गुरू शंकरबाबा महाराज की जय… च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. शंकर महाराजांची महाआरती, महिमा, लिला, कथा, भजन आणि भक्तांना आलेली प्रचिती अशा विविधांगी अनुभूतीने एक दिवसीय सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळा पुण्यात संपन्न झाला.
सातारा रस्त्यावरील शिवछत्रपती शिवाजी मंगल कार्यालय धनकवडी येथे श्री स्वामी भक्त मठाधिपती गुरुवर्य दादा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सद्गुरू शंकर बाबांच्या एक दिवसीय सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अनिल हगवणे, कमलेश दुबे, संतोष सपकाळ, तेजस मर्चंट, श्रीधर साळुंखे, निरंजन जाधव, प्रदीप बधे यांनी सोहळ्यासाठी विशेष सहकार्य केले.
सहस्त्र शंकर गीता पारायण समितीच्या माध्यमातून शंकर बाबांच्या भक्त परिवारात हा पारायण सोहळा संपूर्ण वर्षभर कोणतेही मानधन न घेता साजरा केला जातो. आज पर्यंत हजारो भक्तांच्या घरी हा पारायण सोहळा संपन्न झालेला आहे. त्यातूनच नवीन वर्षाची सुरुवात स्वामीच्या बाबाच्या सेवेने होवो, हा उद्देश आहे.
उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. महाराष्ट्रातील हा पहिला सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळा असून सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून हजारो भक्तांनी उपस्थिती लावली. सोहळ्यात सकाळी इष्टदैवत पीठ पूजन झाल्यानंतर शंकर गीता पारायणाला सुरुवात झाली. सायंकाळी महाआरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर विविध भजनी मंडळांची भजन सेवा सादर झाली.

