पुणे, दि. ०२ जानेवारी २०२५: पुणे परिमंडलामध्ये दरमहा वीजविक्रीचा महसूल आता १९०० कोटींवर गेला आहे. या महसूलाची वसूली करताना शून्य थकबाकीला प्राधान्य द्यावे व कोणत्याही परिस्थितीत चालू वीजबिलांची १०० टक्के वसूली करावी. तसेच नवीन वीजजोडणी, ‘सौर’शी संबंधित विविध योजना, अचूक बिलिंग आदींच्या माध्यमातून ग्राहकसेवा आणखी गतिमान करावी असे निर्देश महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले.
रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात बुधवारी (दि. २) पुणे परिमंडलातील विविध कामांचा मुख्य अभियंता श्री. पवार यांनी आढावा घेतला. पुणे परिमंडलातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत तत्पर ग्राहक सेवा देण्यासाठी अधिक सजग व सज्ज राहावे तसेच ज्या शाखा कार्यालयांचे ग्राहकसंख्येनुसार विभाजन करणे आवश्यक आहे तसे प्रस्ताव त्वरित सादर करावेत अशी सूचना यावेळी त्यांनी केली.
मुख्य अभियंता श्री. पवार यांनी सांगितले, की सद्यस्थितीत पुणे परिमंडलामध्ये २४३ कोटी रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. या थकबाकीसोबतच चालू वीजबिलांची १०० टक्के वसूली करणे क्रमप्राप्त आहे. ग्राहकसेवेच्या बाबतीत पुणे परिमंडलाची कामगिरी उंचावत आहे. नवीन वीजजोडण्या देण्याचा मासिक वेग १६ हजारांवरून २० हजारांवर गेला आहे. नवीन वीजमीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी इन्फ्राची गरज नाही तेथे कोटेशनचा भरणा केल्यानंतर तात्काळ वीजजोडणी देण्यात यावी. अचूक बिलिंगमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे त्याचे प्रमाण वाढून ९५.५२ टक्क्यांवर गेले आहे. वीजग्राहकांची डिजिटल ग्राहकसेवेला पसंती वाढत असून दरमहा राज्यात सर्वाधिक सरासरी ८३ टक्के लघुदाब वीजबिलांचा भरणा ऑनलाइनद्वारे होत आहे. तसेच गो-ग्रीन योजनेला पुण्यातील वीजग्राहकांनी राज्यात सर्वाधिक पसंती दिली आहे.
पुणे परिमंडलामध्ये भविष्यातील वीजसेवेसाठी प्रस्तावित अतिउच्चदाबाच्या २१ पैकी ८ उपकेंद्रांना महावितरणकडून मंजूरी मिळाली आहे. तत्पर ग्राहकसेवेसाठी भोसरी, चाकण उपविभागांचे विभाजन करून नवीन उपविभाग व शाखा कार्यालये तसेच नगररोड विभागात नवीन लोहगाव व चंदननगर शाखा कार्यालयांना मंजूरी मिळाली आहे, अशी माहिती मुख्य अभियंता श्री. पवार यांनी दिली.
‘सौर’च्या माध्यमातून पारंपरिककडून अपारंपरिक ऊर्जानिर्मितीकडे नव्या परिवर्तनाचा वेगवान प्रवास सुरू झाला आहे. यातील पीएम सूर्यघर मोफत वीज योजना व इतर ‘सौर’ योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आणखी वेग द्यावा असे निर्देश मुख्य अभियंता श्री. पवार यांनी दिले. यावेळी सहायक महाव्यवस्थापक (वित्त) सौ. माधुरी राऊत, कार्यकारी अभियंता श्री. धनराज बिक्कड (प्रशासन) तसेच सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता, अधिकारी उपस्थित होते.