पुणे : सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या रोटरी क्लबतर्फे शनिवारी (दि. 4) आणि रविवारी (दि. 5) पुण्यात पहिले रोटरी मराठी साहित्य संमेलन होत आहे. प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या संमेलनात साहित्यिक चर्चा घडणार असून विविध विषयांवर परिसंवादात मान्यवरांची मते ऐकावयास मिळणार आहेत. गप्पा, कविसंमेलन, प्रहसने आणि संगीत नाटकाचेही आयोजन करण्यात आले आहे.
कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर पहिले रोटरी साहित्य संमेलन होणार आहे. दि. 4 रोजी सकाळी 9:15 वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून उद्घाटन समारंभ सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध क्रिकेटपटू पद्मभूषण चंदू बोर्डे यांच्या हस्ते होणार आहे. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे, नगरसेवक जयंत भावे, उपप्रांतपाल मोहन पालेशा, डि. लर्निंग जिल्हा प्रशिक्षक पंकज शहा, संतोष मराठे, नितीन ढमाले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सकाळी 11:30 वाजता संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 2:45 वाजता ‘यशस्वी लेखनाची सूत्रे’ या विषयावर परिसंवाद, दुपारी 4:15 वाजता ‘मन:शांती’ हे प्रहसन, सायंकाळी 4:30 वाजता रोटरियन्सचा सहभाग असलेले निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. तर रात्री 8:30 वाजता ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात शिववंदना नृत्याने होणार असून सकाळी 10 वाजता प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने सन्मान करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता अशोक नायगावकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून दुपारी 2 वाजता ‘ऑफिस ऑफिस’ हे प्रहसन सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2:15 वाजता ए. आय.चा साहित्यावर परिणाम होईल का? या विषयावर परिसंवाद आणि दुपारी 3:45 वाजता ‘आगलावे वि. पेटवे’ हे प्रहसन सादर होणार आहे. ग. दि. माडगूळकर यांच्या गीतांवर आधारित ‘अमृतसंचय’ हा सांगीतिक कार्यक्रम दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 5:30 वाजता प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या समवेत गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. या प्रसंगी सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती असणार आहे. त्यानंतर संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील आणि प्रांतपाल शितल शहा, सूर्यकांत वझे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.