शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सृजनसभा पुणे यांच्या वतीने होनराज मावळे यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांची विशेष मैफिल
पुणे: ख्याल, टप्पा, तराणा, स्वरमालिका याचबरोबर सेवा हैं यज्ञ कुंड समिधा सम हम जले. शिवछत्रपती जय हो. आनंदाचा कंद माझा मधुमिलिंद. जय देव जय देव जय जय शिवराया ही सावरकर लिखित आरती अशा एकाहून एक सरस रचना सादर करीत होनराज मावळे यांनी आपल्या संगीतरचनाकार म्हणून सुरू असलेल्या प्रवासातील स्वरसाधना पुणेकरांसमोर उलगडली. मावळे यांच्या सुरेल संगीत रचनांची पर्वणी श्रोत्यांना या निमित्ताने ऐकायला मिळाली.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सृजनसभा पुणे यांच्या वतीने होनराज मावळे यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांची विशेष मैफिलीचे आयोजन कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहिर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे यावेळी उपस्थित होते. होनराज मावळे, पार्थ कुलकर्णी, अनुजा जोशी, गार्गी काळे (गायन), सई जोशी (संवादिनी), आदेश वाटाडे (कीबोर्ड) केदार टिकेकर, ओंकार तळवणेकर (तबला) अक्षदा इनामदार, सक्षम जाधव (तालवाद्ये) प्रसाद भारदे यांनी निवेदन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला होनराज मावळे यांनी राग श्री मध्ये ‘जय जय एकदंत लंबोदर’ हा ख्याल सादर केला. त्यानंतर राग भीमपलास मध्ये ‘गुनिजन चर्चा करे’ ही रचना सादर केली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात उपशास्त्रीय रचना सादर झाल्या ‘जादूभरी तोरी अखिया रसिली’ हे गार्गी काळे हिने तर ‘गुरु बिन कौन बताये बाट’ या होनराज मावळे यांनी सादर केलेल्या गीताला श्रोत्यांनी विशेष दाद दिली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सादर झालेल्या ‘हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’, ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम’ या गीतांच्या संगीत रचनांनी रसिकांची विशेष दाद मिळवली. ‘भारतमाता स्तुतीपर तराना’ हा या कार्यक्रमातील विशेष आकर्षक रचना होती.
होनराज मावळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललितकला केंद्र येथून शास्त्रीय संगीतातून द्विपदवीधर झाल्या निमित्त संगीत पर्वारंभ या विशेष मैफीलीचे आयोजन प्रा.संगीता मावळे व आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी आयोजन केले.या कार्यक्रमात होनराज यांच्या कला मार्गदर्शकांप्रती कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी डॉ. केशवचैतन्य कुंटे, डॉ. शरद खरे, संजय करंदीकर, यशोधन महाराज साखरे, डॉ. मिलिंद दुगड आदि मान्यवर उपस्थित होते.