राजकीय भूमिका घेणे माझ्या अधिकारात नाही, वरिष्ठांचा निर्णय मान्य
पुणे- माझी छाती फाडली तर साहेबच दिसतील असे वक्तव्य झिरवाळ यांनी केल्यावर,शरद पवार आमचे दैवत असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. आता , पवार कुटुंब एकत्रित रहावे, ही माझी व्यक्तिगत इच्छा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. मात्र, राजकीय भूमिका घेणे माझ्या अधिकारात नाही, असेही ते म्हणालेत. आशा पवार वडिलधाऱ्या आहेत, त्यांनी देवाच्या दारात भावना मांडली, असेही ते म्हणाले.
जुलै 2023 मध्ये अजित पवार काही आमदारांना सोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. शरद पवारांच्या वाढदिवसादिवशी अजित पवार हे शरद पवारांच्या घरी पोहोचले होते. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली होती. तेव्हापासून हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा वाढल्या आहेत. अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी पंढरपूरात बुधवारी पवार कुटुंब एकत्र येण्याचे साकडे पांडुरंगाला घातले होते, त्यावर रोहित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली.
आशा आजींनी पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी कुटुंब एकत्र राहावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची हीच इच्छा आहे. पण शेवटी राजकारण हे राजकारण असते. कुटुंब एक असले, तरी पक्ष दोन आहेत. एका पक्षाचे नेते शरद पवार आहेत, तर दुसऱ्या पक्षाचे अजित पवार आहेत. या दोन प्रमुख नेत्यांना राजकीय भूमिका घ्यावी लागेल. ते काय भूमिका घेतात ते बघावे लागेल, असे रोहित पवार म्हणाले. पवार कुटुंब एकत्रित रहावे, ही माझाी व्यक्तिगत इच्छा आहे. पण आमचे नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी बुधवारी नवीन वर्षानिमित्त पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा पवार कुटुंब एकत्रित गुणा गोविंदाने नांदू दे, असे साकडे आपण पांडुरंगाला घातले असल्याचे आशा पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आईने देखील काही दिवसांपूर्वी पवार कुटुंबातील वाद मिटण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. कुटुंबातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र राहणे ही काळाची गरज असल्याचे रोहित पवार यांच्या आईने म्हटले होते.
दरम्यान, बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ आण प्रफुल्ल पटेल यांनीही पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत भाष्य केले होते. शरद पवार हे आमचे दैवत आहेत. काही राजकीय कारणांवरून आम्ही वेगळे जरी झालो असलो, तरी मात्र त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये आजही आस्था आहे. भविष्यात पवार कुटुंबीय एकत्रच आले, तर यात काही गैर नाही. कारण मी सुद्धा स्वतःलाच पवार कुटुंबाचा एक सदस्य समजतो आणि पवार कुटुंब एकत्र यावे, अशी माझी सुद्धा इच्छा आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले होते.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी देखील शरद पवारांबाबत मोठे विधान केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा एकदा त्यांची शरद पवार यांच्यावर असलेली निष्ठा व्यक्त करून दाखवली आहे. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील. तर माझ्या छातीत तुम्हाला शरद पवार साहेबच दिसतील, असे झिरवाळ म्हणाले. आता शरद पवार यांच्यासमोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार, असेही ते म्हणाले. मी पाडुंरंगाच्या शेजारी पवारसाहेबांना पाहतो. साहेब निश्चित विचार करतील, असा विश्वासही झिरवाळ यांनी व्यक्त केला.