पुणे : दिव्यांग बांधवाना मदतीचा हात देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीने त्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. बुरुड आळी येथे दिव्यांगांसाठी विशेष सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गरजू दिव्यांग बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ उद्योजक रमणशेठ लुंकड, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, उद्योजक विजय कुमार मर्लेचा, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे आणि परिसरातील पाच गरजवंत दिव्यांग बांधवांना या सायकली देण्यात येणार आहेत. तसेच त्यांना आत्मनिर्भर होण्याकरिता ही भेट उपयुक्त ठरणार आहे. ज्येष्ठ उद्योजक रमणशेठ लुंकड यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ उद्योजक रमण लुंकड म्हणाले, दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम खूप महत्त्वाचे आहेत. या सायकलींमुळे त्यांना दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करता येईल. समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमांसाठी हातभार लावला पाहिजे.

