पुणे : हौसेखातर कमरेला पिस्टल लावून फिरणार्या अल्पवयीन मुलाला सहकारनगर पोलिसांनी के के मार्केट च्या पार्किंगच्या जागेत पकडले. त्याच्याकडून गावठी पिस्टल जप्त केले आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्यातीलपोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे नव वर्षाच्या आगमनानिमित्त बंदोबस्तासाठी पेट्रोलिंग करीत होते. ते तीन हत्ती चौकात आले असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक जण के के मार्केट च्या पार्किंगच्या जागेतील टीव्हीएस शोरुमचे पाठीमागील गल्लीत कोणाची तरी वाट पहात असून त्याच्या कमरेला पिस्टल सारखे हत्यार लावलेले दिसत आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी तातडीने कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी बालाजीनगरला जाऊन या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या पॅन्टमध्ये खोचलेले ६० हजार रुपयांचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह जप्त केले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, अमित पदमाळे, सागर सुतकर, योगेश ढोले, महेश भगत,खंडु शिंदे यांनी केली आहे.