बीड- मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडभोवतीचा चौकशीचा फास आता चांगलाच आवळला जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख डॉक्टर बसवराज तेली आज बीडमध्ये पोहोचलेत. यामुळे या प्रकरणाच्या तपासाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणातील सर्वच लागेबांधे स्पष्ट होण्यासाठी वाल्मीक कराडच्या नार्को टेस्टचीही मागणी केली जात आहे.
वाल्मीक कराडने मंगळवारी पुणे स्थित सीबीआयच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासून त्याची कसून चौकशी केली जात आहे. सध्या त्याला बीड शहर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. तिथे त्याची एका बंद खोलीत चौकशी सुरू आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची नियुक्ती केली आहे. बुधवारी या 10 सदस्यीय एसआयटीचा जीआर निघाला. पुणे सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली हे या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करतील.
त्यानुसार बसवराज तेली लवकरच बीडमध्ये येऊन संतोष देशमुख हत्याकांडाच्या चौकशीचा पदभार स्वीकारणार आहेत. ते देशमुख यांची हत्या झालेल्या केज परिसरातील घटनास्थळी भेट देण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील 3 मारेकरी अद्याप फरार आहेत. त्यामुळे त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान एसआयटीपुढे आहे. विशेषतः वाल्मीक कराडवर सध्या केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी खूनाचा म्हणजे कलम 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे खंडणी व संतोष देशमुख हत्या प्रकरण यांचा परस्पर संबंध जोडण्याचे आव्हानही तपास यंत्रणेपुढे आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी रात्री एका ट्विटद्वारे वाल्मीक कराडला ठेवण्यात आलेल्या बीड शहर पोलिस ठाण्यात 5 पलंग आणण्यात आल्याचा दावा केला आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. बीड पोलिस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.
नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलिस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी. शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, रिपाइंच्या सचिन खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी या प्रकरणातील लागेबांधे स्पष्ट होण्यासाठी वाल्मीक कराडच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. ते म्हणालेत की, बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. यामुळे राज्याच्या प्रत्येक घरात एकच चर्चा आहे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. बीड मधील नेते म्हणत आहेत बीडची परिस्थिती बिहार सारखी झालेली आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो बीडची परिस्थिती गुंडांनी अफगाणिस्तानसारखी केलेली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर वाल्मीक कराड यांच्यावर दोन तीन दिवसांनी खंडणीचा गुन्हा दाखल झाला. यानंतर वाल्मीक कराड हा फरार झाला, मग खरेच वाल्मीक कराड निर्दोष होता, तर तो फरार का झाला? त्यानंतर हाच वाल्मीक कराड स्वतः सरेंडर सीआयडी ऑफिसला पुण्यात झाला. या सगळ्या बाबी संशयास्पद आहेत. त्यामुळे या वाल्मीक कराडची तात्काळ नार्को टेस्ट करा, मग सगळेच बाहेर येईल.