पुणे:
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत महायुतीने बहुमतांनी निवडून येत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच पार पडतील अशी अपेक्षा आहे. यादृष्टीने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून महायुतीकडे सत्तेचा कल दिसून येत असल्याने राजकीय चलबिचल सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेना उबाठा गटातील पाच माजी नगरसेवक पाच जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पक्षातील नेत्यांना भेटत नसून विकासकामे पूर्ण करण्यासाठी मदत करत नसल्याचा आरोप संबंधित माजी नगरसेवकांनी केला आहे.
शिवसेनेमधील (उबाठा) पाच माजी नगरसेवक पक्षाला जय महाराष्ट्र करून भाजपात लवकरच प्रवेश करणार असल्याने शिवसेनेला (उबाठा) शहरात खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का देण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर्षी महानगरपालिका निवडणुका होण्याची अपेक्षा असल्याने सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जाण्यात माजी नगरसेवक अधिक उत्सुक आहे.
५ जानेवारी रोजी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या माजी नगरसेवकांचा प्रवेश होणार आहे. बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे , प्राची आल्हाट, संगीता ठोसर, पल्लवी जावळे हे नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका मध्ये देखील मोठ्या प्रमाणात यश मिळवण्याच्या दृष्टीने महायुती मधील पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे .
विशाल धनवडे यांची पोस्ट वाचा जशीच्या तशी
सप्रेम जय महाराष्ट्र, आजच्या या पत्रास कारण की या नवीन वर्षात मी एक निर्णय घेतला आहे आणि या निर्णयात आपली भूमिका महत्वाची आहे. काही निर्णय घेताना त्रास होतो तसा मला ही झाला आहे मागील एक महिन्यापासून झोप नाही, प्रेशर मुळे BP ची गोळी चालू झाली. परंतु आता निर्णय झाला आहे त्यामुळे बाळासाहेब ठाकरे म्हणतात तसे एकदा निर्णय घेतला की, घेतला परत मागे नाही फिरायचे तसे झाले आहे. मी कधी माझ्या स्वप्नात ही विचार केला नाही की माझी शिवसेना मला सोडावी लागेल, ज्या शिवसेनेवर मी एवढं प्रेम केले, ती वाढवण्यासाठी एवढे कष्ट घेतले, ज्या शिवसेनेने मला एवढे प्रेम दिले, नाव दिले, मोठे केले ती शिवसेना सोडताना खूप त्रास होतो आहे परंतु शिवसेना का सोडतोय ? याला खूप कारणे आहेत परंतु जाताना कोणाला ही नाव ठेवून जायचे नाही यामध्ये माझी शिवसेना, माझे उद्धव साहेब, आदित्य साहेब यांच्या बद्दल मला खूप आदर आणि प्रेम आहे त्यांच्या बद्दल कोणतीही तक्रार नाही. परंतु पुण्यातील शिवसेनेला कोणीही वाली नाही इथे जिल्ह्यात पक्षालाच शिवसेना नकोय असे वाटायला लागले आणि यातूनच घुसमट चालू झाली. ना पुण्यात लोकसभेला जागा, ना ही विधानसभेला. आणि जागा मिळाली तरीही त्या उमेदवाराच्या मागे कोणतीही ताकत द्यायची नाही कोणतीही रसद पुरवायची नाही. ना कोणत्या शिवसैनिकाला कसलीही मदत करायची नाही ना कोणत्या शिवसैनिकांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचे नाही . पुण्यात शिवसेनेला कोणीही वाली नाही. ज्यांच्यात शिवसेना वाढवण्यासाठी काम करण्याची भूक आहे त्याला काम करू न देणे हे मागील 5 वर्षे झाले चालू आहे, पक्षातील जे नगरसेवक आहे ते वाढवायचे सोडून जे आहेत त्यांच्याच पायात पाय घालण्याचे काम चालू आहे. संपर्क प्रमुखांच्या कानावर यासर्व गोष्टी असून सुद्धा ते काहीही करू शकले नाहीत असे म्हण्यापेक्षा त्यांच्या हातात काहीही न्हवते असे आहे.
जे काहीही करू शकत नाही असे लोक संघटना चालवतं आहेत, ज्यांचे खरे काम back ऑफिस सांभाळणे आहे त्यांना पक्ष सांभाळायला दिला आहे. पक्षात मागील 5 वर्षात पक्ष वाढवण्यासाठी एकही बैठक झाली नाही की त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही.
असो अशी बरीच कारणे आहे परंतु आता कोणतीही कारणे न देता मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो आहे पुढील काळात प्रभागासाठी आणि शहरासाठी खूप काही करायचे आहे नक्कीच जे करू ते चांगले करू असा विश्वास आहे यामध्ये तुमची साथ मोलाची आणि महत्वाची आहे. आपणास नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. आपला नम्र : विशाल धनवडे