पुणे -क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केन्द्राचे अत्यंत प्रतिष्ठेचे असलेले या वर्षीचे एम.ए. कथक मधील सुवर्णपदक अरुंधती जितेन्द्र अभ्यंकर हिने प्राप्त केले. गेल्या एक तपाहून जास्त काळ अरुंधती कथकचे शास्त्रीय शिक्षण तिची गुरू तेजस्विनी साठे यांच्याकडे घेत आहे. नुकतेच पुणे विद्यापीठाचे एम.ए.चे निकाल जाहीर झाले. त्यात अरुंधतीने प्रथम क्रमांक पटकावला. तिला 9.06 CGPA मिळाले. 9 च्या वर CGPA मिळवणारी या वर्षीच्या संपूर्ण एम.ए. कथकच्या बॅचमधील अरुंधती अभ्यंकर ही एकमेव विद्यार्थिनी आहे.
अरुंधतीचे लहानपणापासून कथकवर असलेले प्रेम, त्यात पारंगत होण्यासाठी तिने केलेली सातत्यपूर्ण मेहनत, तिची गुरूवर असणारी निस्सीम श्रध्दा व आदर, उत्तम गुरूभगिनी व सहनृत्यांगना, या सगळ्याचे तिला मिळालेले हे फळ आहे. अरुंधतीने संस्कृत विषयात पदवी प्राप्त केली असून आजपर्यंत अनेक नृत्यस्पर्धांमधे तिने पारितोषिके मिळवली आहेत.