माझी छाती फाडली तर साहेबच दिसतील – झिरवाळ
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी देखील शरद पवारांबाबत मोठे विधान केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा एकदा त्यांची शरद पवार यांच्यावर असलेली निष्ठा व्यक्त करून दाखवली आहे. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील. तर माझ्या छातीत तुम्हाला शरद पवार साहेबच दिसतील, असे झिरवाळ म्हणाले. आता शरद पवार यांच्यासमोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार, असेही ते म्हणाले. मी पाडुंरंगाच्या शेजारी पवारसाहेबांना पाहतो. साहेब निश्चित विचार करतील, असा विश्वासही झिरवाळ यांनी व्यक्त केला.
मुंबई-शरद पवार आणि अजित पवार आगामी काळात एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण अजित पवारांच्या गटातील अनेक नेत्यांची तशी विधाने समोर येत आहेत. शिवाय अजित पवार यांच्या मातोश्रींनीही देखील पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत भावना व्यक्त केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील याबाबत मोठे विधान केले आहे. पवार कुटुंबीय एकत्र आले, तर त्यात काही गैर नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणालेत.
जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार काही आमदारांना सोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. शरद पवारांच्या वाढदिवसादिवशी अजित पवार हे शरद पवारांच्या घरी पोहोचले होते. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली होती. तेव्हापासून हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा वाढल्या आहेत. त्यात आज प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार हे आमचे दैवत आहेत. काही राजकीय कारणांवरून आम्ही वेगळे जरी झालो असलो तरी मात्र त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये आजही आस्था असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. भविष्यात सुद्धा पवार कुटुंबीय एकत्रच आले, तर यात काही गैर नाही. कारण मी सुद्धा स्वतःलाच पवार कुटुंबाचा एक सदस्य समजतो आणि पवार कुटुंब एकत्र यावे, अशी माझी सुद्धा इच्छा असल्याचे ते म्हणाले.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सुद्धा त्यांना भेटायला गेलो होतो. अनेकांनी राजकीय तर्कवितर्क लावले. त्यांच्या बरोबरचे संबंध आम्हाला आजही टिकवायचे आहेत, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
पवार कुटुंब एकत्रित गुणा गोविंदाने नांदू दे
अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी नवीन वर्षानिमित्त पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा पवार कुटुंब एकत्रित गुणा गोविंदाने नांदू दे, असे साकडे आपण पांडुरंगाला घातले असल्याचे आशा पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आईने देखील काही दिवसांपूर्वी पवार कुटुंबातील वाद मिटण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. कुटुंबातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र राहणे ही काळाची गरज असल्याचे रोहित पवार यांच्या आईने म्हटले होते.