सर्वांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी भरघोस आर्थिक मदत–महाराष्ट्रातील माओवाद्यांची भरती पूर्णतः बंद
गडचिरोली -गडचिरोली जिल्ह्यातील 11 कुख्यात नक्षलवाद्यांनी बुधवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. या नक्षलवाद्यांच्या शिरावर लाखोंचे बक्षीस होते. पण आता त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या पुनर्वसनासाठी काही आर्थिक मदतही घोषित केली आहे.
गडचिरोली येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात मागील 38 वर्षांपासून नक्षली चळवळीत सक्रीय असणाऱ्या ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे शस्त्रे टाकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे भारतीय संविधान देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी आज दिवसभर गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. त्यात अनेक महत्त्वाचे कार्यक्रम झाले. सी 60 च्या अधिकाऱ्यांनी सातत्याने विविध चकमकींत शौर्य दाखवत आपले शौर्य दाखवले. त्यांनी अनेक माओवाद्यांना निशस्त्र करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.
पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद संपवण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे. उत्तर गडचिरोली आता माओवाद्यांपासून मुक्त झाली आहे. दक्षिण गडचिरोलीही लवकरच माओवाद्यांपासून मुक्त होईल याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. पोलिसांनी येथे राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे मागील 4-5 वर्षांत येथील एकही तरुण माओवादी संघटनेत भरती झाला नाही. किंबहुना महाराष्ट्रात माओवाद्यांची भरती पूर्णतः संपुष्टात आली आहे. हे सर्वकाही पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून घडले असून, हे एक अत्यंत मोलाचे कार्य आहे.
जनतेचा विश्वास माओवाद्यांवर नाही तर प्रशासनावर, राज्यावर, देशावर व आपल्या संविधानावर वाढत आहे याचे द्योतक आहे. त्यामुळे आता कुणीही संविधान विरोधी चळवळीत जायला तयार नाही हे यातून स्पष्ट होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पोलिसांनी अनेक जहाल माओवाद्यांना कंठस्नान घातले. अनेक नक्षलवादी शरण येत आहेत. त्यामुळे नक्षलवादाचे कंबरडे मोडले आहे. आजही जे आत्मसमर्पण झालेत, त्यात 38 वर्षांपासून नक्षली चळवळीत सक्रीय असणाऱ्या ताराक्काचाही समावेश आहे. ताराक्का या भूपतीच्या पत्नी आहेत. गडचिरोलीत नक्षलवाद रुजवण्यात अग्रणी असणाऱ्या लोक आता पोलिस प्रशासनाला शरण येऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहेत. आज त्यांच्यासह 11 जणांनी आत्मसमर्पण केले.
आज माओवाद हा कोणताही विचार नाही, कोणताही आचार नाही. तो केवळ भारतीय व्यवस्थेवर आमच्या संविधानावर विश्वास नाही अशा प्रकारच्या मंडळींनी अराजकता निर्माण करण्यासाठी हे अभियान उभारले. सुरुवातीच्या काळात काही लोक भरकटले. पण आज जे लोक या चळवळीत सहभागी आहेत, त्यांच्या लक्षात येत आहे की, न्याय हा भारतीय संविधान व त्यातून अस्तित्त्वात आलेल्या संविधानातूनच मिळेल. आज विकास होत आहे, तसतसा माओवादाची पिछेहाट होत आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातून माओवाद पूर्णपणे हद्दपार झाल्याचे दिसून येईल.
2025 च्या पहिल्या दिवशी एक नवीन पहाट उगवली आहे. एक नवीन सूर्य उगवला आहे. हा सूर्य असाच पुढे गेला पाहिजे. आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी आता सन्मार्गावर आलेत. सरकार त्यांचे पूर्ण पुनर्वसन केल्याशिवाय थांबणार नाही. त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांना खरा मार्ग हा भारतीय संविधानाचा असल्याचे पटवून द्यावे. त्यांना संविधान स्वीकारण्यास प्रवृत्त करावे, असेही मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.